
नागपूर-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक यंदा महाराष्ट्रातील पुणे येथे होणार आहे. ही तीन दिवसीय समन्वय बैठक १४ ते १६ सप्टेंबर दरम्यान होणार असून ही अखिल भारतीय स्तरावरील सर्वसमावेशक समन्वय बैठक वर्षातून एकदा घेतली जाते, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रसिद्धी प्रमुख सुनील आंबेकर यांनी दिली.
या बैठकीला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे आणि पाचही सहसरकार्यवाह व इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत संघ परिवारातील ३६ विविध संघटनांचे प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार आहेत. यात राष्ट्र सेविका समिती, वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनता पार्टी, भारतीय किसान संघ, विद्या भारती, भारतीय मजदूर संघ, संस्कार भारती, सेवा भारती, संस्कृत भारती यांचा प्रामुख्याने समावेश आहे. गेल्या वर्षी ही बैठक रायपूर येथे झाली होती.
या बैठकीत सहभागी होणाऱ्या सर्व संघटना समाजजीवनातील विविध पैलूंबाबत त्यांचे अनुभव व कार्य याबाबत सविस्तर चर्चा करणार आहेत. या बैठकीत सध्याच्या राष्ट्रीय परिस्थितीसोबतच सामाजिक समरसता, पर्यावरण, कौटुंबिक प्रबोधन, सेवा कार्य, सामाजिक, आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षा या विविध विषयांवर विस्तृत चर्चा होणार आहे. सामाजिक बदलाच्या विविध क्षेत्रातील कारक कृतींवरही चर्चा केली जाणार आहे.