
मुंबई- भाजप नेते किरीट सोमय्या यांचा कथित व्हिडीओ व्हायरल केल्याच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी एका खासगी वृत्त वाहिनीच्या संपादकांवर गुन्हा दाखल केला आहे. (BJP Leader Kirit Somaiya Video Case) या प्रकरणात मुंबई पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ५०० (मानहानी) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (ई) आणि ६७ (ए) अंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. हा गुन्हा सायबर पोलिस ठाण्यात दाखल झाल्याची माहिती आहे.
मध्यंतरी भाजप नेते किरीट सोमय्या यांचे कथित व्हीडिओ एका खासगी वाहिनीने दाखविले होते. त्यामुळे किरीट सोमय्या यांची बदनामी झाल्याची तक्रार होती. काही पक्ष, संघटनांनी किरीट सोमय्या यांच्या विरोधात आंदोलन देखील केले होते. आता या प्रकरणात दोन संपादकांवर सायबर पोलिस उपायुक्त यांच्या देखरेखीखाली पूर्व सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी हाती घेतली होती. सोमय्या यांच्या तक्रारीनुसार मुंबई गुन्हे शाखेकडे तपास सोपवण्यात आला आणि सायबर पोलिसांनी तपास हाती घेतला आहे. मंगळवारी किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी आपला जबाब नोंदविला आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी या प्ररकणी सभागृहात किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
