
एअर होस्टेस हत्या करणाऱ्या आरोपीची लॉकपमध्ये आत्महत्या
(Mumbai)मुंबई– एअर होस्टेसचा गळा चिरून खून करणाऱ्या आरोपीने पोलिस ठाण्यातील लॉकपमध्ये पँटने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत अंधेरी पोलिस ठाण्यात घडला. विक्रम अटवाल असे आरोपीचे नाव होते. शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास तो लॉकपमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्यावर पवईत राहणाऱ्या रुपल आग्रे नामक एअर होस्टेसची गळा चिरून हत्या केल्याचा आरोप होता.
रुपल आग्रे ही एअर इंडियामध्ये एअर होस्टेसचे प्रशिक्षण घेत होती. ती मूळची छत्तीसगडमधील रायपूर जिल्ह्यातील रहिवासी होती. एप्रिल महिन्यातच ती मुंबईत आली होती. मुंबईत (Rupal Marol)रुपल मरोळ येथील टाटा पॉवर सेंटर बस स्थानकाजवळील कृष्णलाल मारवाह मार्गावरील एनजी कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होती. ती तिची बहीण आणि तिच्या मित्रासोबत राहत होती. रुपलची बहीण आणि तिचा मित्र आठ दिवसांपूर्वी मुंबईहून रायपूरला गेले होते. या दरम्यान रविवारी ही घटना घडली. विक्रम अटवाल हा तिच्यावर अत्याचार करण्यासाठी घरात शिरला होता. मात्र, तिने प्रतिकार केल्याने विक्रमने चाकूने गळा चिरून तिची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
