छत्रपतींनी वापरलेली वाघनखं १६ नोव्हेंबरला येणार मायदेशी

0
35

(MUMBAI)मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांनी या वाघनखांच्या साह्यानं अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला, ती वाघनखं इंग्लंडहून मायदेशी आणली जाणार असली तरी आता त्याची नेमकी तारीखही राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar) यांनी जाहीर केली आहे. १६ नोव्हेंबरला ती मुंबईत आणली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) ही वाघनखं सध्या लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आली आहेत.

ती परत आणण्यासाठी इंग्लंडसोबत सामंजस्य करार करण्यात येणार आहे. त्यानंतर ती भारताच्या सुपूर्द केली जाणार आहे.
यासंदर्भात मुनगंटीवार यांनी कालच याबाबत घोषणा केली होती. आज त्यांनी सोशल मिडियावर त्याची सविस्तर माहिती शेअर केली. मुनगंटीवार यांनी सांगितले की, देशाची आणि महाराष्ट्राची अस्मिता असणारी शिवरायांची ही वाघनखं महाराष्ट्रात परत आणण्यात यश येणार असल्याचा आम्हाला आनंद आहे. सर्वांना ही वाघनखं पाहण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहेत. ही वाघनखं ज्या ठिकाणी ठेवण्यात येतील, त्या ठिकाणी अफजलखानाच्या वधाचा प्रसंग देखील उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयाशी यासंदर्भात सामंजस्य करार करावा लागणार आहे. त्यात ही वाघनखं कुठेही फिरवता येणार नाहीत. ती संग्रहालयात एकाच ठिकाणी ठेवण्यात यावीत, या वाघनखांचे इन्शुरन्स काढण्यात यावे, जेणेकरून त्याची चोरी होऊ नये, या वाघनखांच्या सुरक्षेसंबंधी योग्य ती काळजी घ्यावी, अशा अटी राहणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, छत्रपतींची जगदंबा तलवारही २०२४ पर्यंत भारतात आणण्याचे प्रयत्न राहणार असून त्यासंदर्भातही ब्रिटनने सकारात्मक भूमिका घेतली असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. यासंदर्भात केंद्र सरकारमार्फत पाठपुरावा केला जात आहे

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा