कुणबी, ओबीसी आंदोलन सुरू,17 रोजी निघणार जिल्हानिहाय मोर्चे

0
23

नागपूर : मराठ्यांना कुणबी अर्थात ओबीसी म्हणून प्रमाणपत्र सहन केले जाणार नाही, राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल अशी परखड भूमिका घेत सर्वशाखीय कुणबी, ओबीसी आंदोलन कृती समितीने आज रविवारपासून संविधान चौकात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. येत्या 17 सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय मोर्चे निघणार असल्याची माहिती देण्यात आली. ओबीसी युवा संघातर्फे उद्यापासून चंद्रपूर येथे अन्नत्याग आंदोलन सुरू होत आहे त्याला पाठींबा देण्याची घोषणाही करण्यात आली. आज सर्वपक्षीय नेत्यांनी या आंदोलनस्थळी भेट दिली. राज्य सरकारने कुणबी अर्थात ओबीसी समाजाला गृहीत धरून कुठलाही निर्णय करू नये असा इशारा ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी दिला.
यावेळी कृती समितीचे संयोजक पुरुषोत्तम शहाणे पाटील यांनी सांगितले की, हे आंदोलन तूर्तास शांततेच्या मार्गानेच करण्यात येईल. सरकारने लेखी आश्वासन देईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील. मात्र, सरकारने मराठा समाज आंदोलकांच्या दबावात येऊन काही निर्णय घेण्याचा प्रयत्न केलाच तर राज्यातील कुणबी- ओबीसी पेटून उठेल व आंदोलन तीव्र होईल, असा इशाराही दिला. राजेश काकडे यांनी जातीय जनगनना करण्याची मागणी केली. सुरेश गुडधे पाटील यांनी केंद्र सरकारने विशेष अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा ठराव संमत करण्याची मागणी केली. आंदोलनात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार समीर मेघे, कृष्णा खोपडे, जिल्हा अध्यक्ष माजी आमदार सुधाकर कोहळे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष दूनेश्वर पेठे, माजी आमदार अशोक धवड, डॉ आशिष देशमुख, कृती समितीचे अवंतिका लेकुरवाळे, जानराव केदार, प्रल्हाद पडोळे, बाबा तुमसरे, गुुणेश्वर आरीकर, राजेंद्र कोरडे, सुरेश वर्षे, अरुण वराडे, प्रा. सुषमा भड, नरेश बरडे, सुरेश कोंगे, राजेंद्र ठाकरे आदी अनेकजण उपस्थित होते.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा