भारत-पाक सामन्यावर आजही पावसाचे सावट

0
64

कोलंबो-आशिया चषकाच्या सुपर-4 मधील भारत-पाकिस्तान (India Vs Pakistan Cricket Match) यांच्यातील हायव्होल्टेज सामना रविवारी पाऊस आणि ओल्या मैदानामुळे पूर्ण होऊ शकला नव्हता.(Ashia Cup 2023) आता हा सामना आज दुपारी तीन वाजल्यापासून पुढे सुरु केला जाणार असून कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर आजही पावसाचे सावट आहे. त्यामुळे क्रिकेट रसिकांचा हिरमोड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सामना जेथे थांबविण्यात आला, तेथूनच तो पुन्हा सुरु होणार आहे. खेळ थांबला तोपर्यंत टीम इंडियाने २४.१ षटकांत दोन गडी गमावून १४७ धावा केल्या होत्या आणि या धावसंख्येसह आता भारताला पुढे खेळावे लागणार आहे. भारताचा डाव सुरु असतानाच सुमारे पाच वाजताच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दीड तासाच्या पावसानंतर ग्राउंड स्टाफ सुमारे चार तास मैदाना कोरडे करण्याच्या प्रयत्नांना लागला होता. या काळात पंचांनी अनेकवेळा मैदानाची पाहणीही केली. रात्री साडेआठ वाजता चौथ्यांदा पाहणी केल्यावर सामना राखीव दिवशी म्हणजे आज पुढे सुरु करण्याचा निर्णय झाला.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारताला वेगवान सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या पॉवरप्लेमध्येच पन्नासची भागीदारी केली. पॉवरप्लेनंतर रोहित शर्माने शादाब खानविरुद्ध 3 षटकार आणि 1 चौकार लगावला. रोहितने कारकिर्दीतील 50 वे अर्धशतक पूर्ण केले, मात्र 56 धावा करून शादाब खानचा बळी ठरला. रोहितच्या विकेटसह त्याची शुभमनसोबतची १२१ धावांची भागीदारी तुटली. या दोघांनी गेल्या सामन्यात नेपाळविरुद्ध 147 धावांची शतकी भागीदारी केली होती. रोहित-गिलची ही ५वी शतकी भागीदारी आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा