
मुंबई : सोशल मिडियाच्या माध्यमातून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर पत्रकार परिषद घेण्यापूर्वी शिंदे, पवार आणि फडणवीस यांच्या संवादाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून त्यावरून राज्य सरकारवर टीका होत आहे. त्यावर स्पष्टीकरण देताना शिंदे यांनी सांगितले की, पत्रकार परिषदेमध्ये जाताना फक्त मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्याचे बोलायचे, इतर काही राजकीय वक्तव्य करायचे नाही, अशी आमची चर्चा झाली होती. पण, सोशल मीडियाच्या माध्यामातून त्यामध्ये तोडफोड करुन लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल असा मेसेज पसरवला जात आहे. अशा अपप्रचाराला व दिशाभूल करणाऱ्या गोष्टींना मराठा समाजाने बळी पडू नये, असे आवाहनही शिंदे यांनी केले.
शिंदे म्हणाले की, कुठलेही राजकीय भाष्य, प्रश्नोत्तरे आज नको अशी चर्चा आम्ही करत होतो. परंतु काही लोक सोशल मीडियावर काहीही अर्थ काढून, संभ्रमाचे वातावरण तयार होईल, असा प्रयत्न करीत आहेत. मराठा आरक्षण देण्याचीच भूमिका सरकारची स्पष्ट आहे, यासाठीच त्यादिवशी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती, असेही ते म्हणाले.