ठाकरे गटाला धक्का, घोटाळ्यात आमदार वायकरांवर गुन्हा

0
33

मुंबई-शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते व उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आमदार रवींद्र वायकर यांच्यासह त्यांच्या पत्नीवर मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आलाय. (MLA Ravindra Waikar booked) मुंबईच्या जोगेश्वरी भागात महापालिकेच्या राखीव भूखंडावर एक पंचतारांकित हॉटेल बांधल्याचे हे प्रकरण असून आमदार वायकर यांनी हे हॉटेल बांधण्यापूर्वी महापालिकेची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. यासंदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तक्रार दाखल करून सुमारे पाचशे कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता.

सोमय्यांच्या या तक्रारीनुसार आर्थिक गुन्हे शाखेने वायकर यांना चौकशीसाठीही बोलावले होते. त्यानंतर आता त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे वायकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याप्रकरणी रवींद्र वायकर व त्यांच्या पत्नीसह एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेच्या वतीने देखील या प्रकरणात तक्रार दाखल झाली आहे. या तक्रारीनुसार आमदार वायकर, पत्नी मनीषा वायकर, त्यांचे व्यावसायिक भागिदार आसू नेहलनाई, राज लालचंदानी, पृथ्वीपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरुण दुबे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे ठाकरे गटाची मोठी कोंडी झाली आहे. अलिकडेच कोव्हीड घोटाळ्यात माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचीही चौकशी सुरु झाली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा