
नाशिक : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न ठाकरे गटात सुरु आहेत. घोलप यांनी दिलेली दोन दिवसांची मुदत संपल्यावर आज शिवसेना भवनात बैठक होत असून शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची चर्चा होणार आहेत. (UBT Leader Baban Gholap) मात्र, या बैठकीला घोलप मात्र गैरहजर राहणार असल्याची माहिती आहे. स्थानिक नेते भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा पक्षात घेण्यात आल्याने व त्यांना शिर्डीतून लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याच्या शक्यतेने घोलप नाराज असून त्यांनी दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता.
घोलप यांचे म्हणणे आहे की, पक्षाने वाकचौरे यांना उमेदवारी द्यायची होती तर मला का आश्वासन दिले? माझे संपर्क प्रमुखपद का काढून घेण्यात आले? शिवाय, उद्धव ठाकरे यांच्या शिर्डी दौऱ्यासंदर्भात आपल्याला कळविण्यात देखील आले नव्हते. घोलप यांनी पक्षाच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. अद्याप तरी घोलप यांची नाराजी दूर झालेली नाही.