
नागपूर – ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल असे स्पष्ट करतानाच लवकरच मी नागपुरातील संविधान चौक येथे ओबीसी समाजाच्या आंदोलनस्थळी जाणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यामुळे ओबीसी महासंघ आंदोलनाची देखील सांगता होण्याची आशा बळावली आहे. आज या आंदोलनाला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेकांनी भेट दिली.
विविध सामाजिक संघटनांचे 19 प्रतिनिधी साखळी उपोषणावर बसले . संभाजीनगर येथून नागपुरात आल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्य सरकारची भूमिका आहे की ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही आम्ही धक्का लागू देणार नाही, ओबीसींचे आरक्षण कमी होऊ देणार नाही,कुणाला नव्याने वाटेकरी होऊ देणार नाही, इतकी स्पष्ट भूमिका सरकारनं घेतली आहे, त्यामुळं ओबीसी बांधवाना आवाहन आहे की त्यांनी आंदोलन मागे घ्यावे, मी त्यांना भेटून विनंती करणार आहे, चंद्रपूरला जे अन्नत्याग उपोषण सुरू आहे तेही सोडविले जाणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
