
– विनोद देशमुख
भारताचा दुसरा स्वातंत्र्यलढा महाराष्ट्रातील मराठवाडा, राजुरा, तेलंगणा, आंध्रप्रदेश, उत्तरी कर्नाटक या जुन्या निझाम (हैदराबाद) स्टेट भागात लढला गेला आणि त्याला 17 सप्टेंबर 1948 रोजी यश मिळून या लोकांना स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे हा भाग एक वर्ष एक महिना दोन दिवस उशिराने भारतात विलीन झाला. त्याला आज 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त…

भारतासारखा विचित्र देश जगात दुसरा नसेल. ब्रिटिशांच्या तावडीतून सुटका होताना तो खंडित तर झालाच. पण, हा खंडित भारत सुद्धा संपूर्णपणे एकावेळी स्वतंत्र झाला नाही. बहुसंख्य भारत 15 आॅगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्यदिन साजरा करीत असताना, आजच्या तेलंगणासह आंध्रप्रदेश, कर्नाटकचे उत्तरी जिल्हे, आपल्या मराठवाड्याचे आठ जिल्हे आणि चंद्रपूर जिल्ह्याचा जुना राजुरा तालुका (आता 3 तालुके) हा भूभाग निझामाच्या गुलामीतच होता. या भागाला स्वातंत्र्य मिळाले 17 सप्टेम्बर 1948 रोजी. त्यामुळेच या भागाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आज 17 सप्टेम्बरला साजरा केला जात आहे. उर्वरित भारताचे स्वातंत्र्य 77 व्या वर्षात पदार्पण करून महिना उलटून गेल्यानंतर !
निझामाचा डाव उधळला
ही विसंगती निर्माण होण्यास कारणीभूत ठरला स्वत: हैदराबादचा निझाम. हा संपूर्ण भाग त्याच्या मालकीचा, म्हणजे निझाम (हैदराबाद) स्टेट होता आणि निझामाला भारतात विलीन व्हायचे नव्हते. इस्लामच्या नावावर त्याला येथे ‘दक्षिण पाकिस्तान’ बनवायचा होता. त्यासाठी त्याने मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) हा राजकीय पक्ष स्थापन करवून भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तसेच, एमआयएमशी संलग्न असलेल्या रझाकार (निमलष्करी दल) संघटनेला प्रोत्साहन देऊन बहुसंख्य हिंदू जनतेवर अत्याचार सुरू केले. विशेषत: कासिम रिझवी हा रझाकार आणि एमआयएम या दोन्हींचा नेता असताना रझाकारांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. याच कासिम रिझवीने पुढे भारत सोडून पाकिस्तानात जाताना एमआयएम हा पक्ष अब्दुल वाहिद ओवैसी या वकिलाकडे सोपविला. तेव्हापासून गेली पाऊणशे वर्षे या पक्षात ओवैसींची घराणेशाही आहे. खा. असदुद्दिन आणि आ. अकबरुद्दिन हे ओवैसी बंधू ही त्यांचीच पिलावळ आजही स्वतंत्र भारतात धर्मांध, विषारी फूत्कार काढत असतात, हे आपले दुर्दैव.
अशा या अत्याचारी निझाम, रिझवी आणि त्यांच्या समर्थकांना धडा शिकविण्यासाठी पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना शेवटी 13 ते 17 सप्टेम्बर 1948 या पाच दिवसात ‘आॅपरेशन पोलो’ (पोलिस अॅक्शन) ही लष्करी कारवाई करावी लागली. तेव्हा कुठे सातवा निझाम मिर उस्मान अली खान शरण आला आणि निझाम स्टेट मुक्त होऊन भारतात विलीन झाले.
त्याआधी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली निझाम स्टेटच्या समस्त खेड्यापाड्यातील हिंदू जनतेने तीव्र लढा उभारून निझामाविरुद्ध सशस्त्र आणि अहिंसक असे दोन्ही उठाव केले. हाच या भागातील स्वातंत्र्यलढा होय. यालाच हैदराबाद मुक्ती संग्राम म्हणतात. मराठवाडा मुक्ती संग्राम आणि राजुरा मुक्ती संग्राम त्याअंतर्गतच येतो. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव (तेलंगणा), माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण (मराठवाडा) आणि राजुऱ्याचे माजी नगराध्यक्ष आणि माजी आमदार अॅड. शंकरराव देशमुख हे तिघेही हैदराबादला वकिली शिकत असतानाचे मित्र होते आणि स्वामीजींंचे कट्टर अनुयायी होते. त्यांनी मुक्ती संग्रामात हिरीरिने भाग घेतला. पुढे आपापल्या भागात काॅंग्रेसचे लोकनेते म्हणून हे तिघेही गाजले.
राजुऱ्याचे योगदान
राजुरा येथे गेल्या तीनशे वर्षांहून अधिक काळ राहणाऱ्या देशमुख कुटुंबातील चौघांनी, इतर अनेक गावकऱ्यांसोबतच या संघर्षात सक्रिय भाग घेतला, याचा आम्हा वंशजांना अभिमान आहे. अॅड. शंकरराव, अॅड. दामोदरराव, व्यंकटराव आणि वामनराव या चार देशमुखांनी रझाकारांशी थेट मैदानात टक्कर घेतली. यातील पहिल्या दोघांनी तुरुंगवासही भोगला. शंकरराव नंतर राजुऱ्याचे सलग 23 वर्षे नगराध्यक्ष आणि पुढे 6 वर्षे विधान परिषदेचे सदस्य राहिले. रझाकारांनी त्यांना पळवून नेऊन जमिनीत गाडून मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. याच शंकररावांनी 15 आॅगस्ट 1947 यादिवशी राजुऱ्यात तिरंगा फडकवून भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन साजरा केला, तर दामोदररावांनी वर्ध्यातील शाळेवर त्याच दिवशी तिरंगा फडकवून भारताच्या स्वातंत्र्याला अभिवादन केले.
दामोदरराव आणि व्यंकटराव यांनी शंकरराव देशमुखांच्या घरातील बाॅम्ब शिताफीने लपवून कुटुंबावरील मोठे संकट टाळले. दामोदरराव नंतर आदिलाबादला स्थायिक झाले आणि जनसंघाचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूकही लढले. पैनगंगा (वर्धा) नदीवरील रेल्वे पूल ते तेलंगणातील मंचेरियलपर्यंत भारतीय लष्कराच्या गाडीला सुखरूप पोहोचवण्याचे जोखमीचे काम करून वामनरावांनी पोलिस अॅक्शनला प्रत्यक्ष मदत केली. मुख्य म्हणजे, मुक्ती संग्रामात भाग घेण्यासाठी त्यांनी निझामाच्या अबकारी खात्यातील नोकरीवर लाथ मारण्याचे अनोखे धाडस तरुण वयात दाखविण्याची कमाल केली.
अशा आमच्या स्वातंत्र्यप्रेमी, धाडशी पूर्वजांमुळे आणि इतर हजारो स्वातंत्र्यसैनिकांमुळेच पूर्वीच्या निझाम स्टेटमधील आम्ही लोक, वर्षभर उशिराने का होईना, स्वतंत्र होऊन भारताचा भाग होऊ शकलो. म्हणूनच आजच्या अमृत महोत्सव वर्षदिनी हैदराबाद मुक्ती संग्रामाचे शतशत आभार आणि त्यात लढलेल्या सर्वांबद्दल कृतज्ञता. तुम्ही नसते तर आज आम्ही भारतीय नसतोच. याउलट, दक्षिण पाकिस्तानचे नागरिक म्हणून भारताचे शत्रू राहिलो असतो; सध्याचे पाकिस्तान आणि बांगलादेश येथील लोकांसारखे !