
नागपूर : श्री गणेशचतुर्थीच्या मुहुर्तावर श्रीगणेशाचे हर्षोल्हासात आगमन झाले आहे. राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धूम दिसत आहे. त्यामुळे वातावरण मंगलमय झाले आहे.
यंदा गणेशभक्तांमध्ये विशेष उत्साह दिसत आहे. मागील दोन दिवसांपासूनच सर्वत्र गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग सुरु होती. पावसाने उघाड दिल्याने या तयारीला चांगलाच वेग आला होता. गणेशमूर्तीच्या खरेदीपासून तर पुजा साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये झुंबड उडाली होती. अनेक सार्वजनिक मंडळांनीही भव्य मिरवणुकांद्वारे गणेशमूर्तीचं मंडपांमध्ये स्वागत केलं. सोमवारी रात्री उशिरापर्यंत श्रीगणेशाच्या आगमनाच्या मिरवणुकांनी शहर दुमदुमून गेलं होते. ढोलताशाच्या तालात भाविक बाप्पाचे मनोभावे स्वागत करीत होते. तर काही मंडळांच्या गणेशमूर्तींचं आजच आगमन झालं.आज मुहुर्त साधून सर्वत्र गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. मंगळवारी टेकडी गणेश मंदिरासह इतर मंदिरांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती.