
मुंबई- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणानंतर निजामकालीन कुणबी नोंदी शोधण्यासाठी हैदराबादला गेलेले छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाचे पथक रिकाम्या हाती परतल्याची माहिती आहे. (Maratha Reservation Issue) १३ सप्टेंबर रोजी हे पथक हैदराबादला रवाना झाले होते. मात्र, या पथकाला फारसे काही हाती लागले नसल्याचे वृत्त काही प्रसार माध्यमांनी दिले आहे. त्यामुळे आरक्षणाचा पेच वाढणार का, असा प्रश्न उपस्थित होतोय.
मराठवाडा परिसरातील मराठा समाजाच्या निजामकालीन कुणबी नोंदींचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांचे एक पथक हैदराबादला अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब बेलदार यांच्या नेतृत्वात 13 सप्टेंबर रोजी गेले होते. या पथकाला १९६७ पूर्वीच्या निजामकालीन कुणबी नोंदी शोधायच्या होत्या. पण या पथकाच्या हाती फार काही लागले नसल्याची माहिती आहे. या पथकाने हैदराबादमध्ये जावून जुन्या रेकॉर्डची पाहणी केली. पथकाचा अंतिम अहवाल अद्याप आला नाही. पण या पथकाच्या हाती फार काही लागले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पथकाने निजामकालीन सर्व रेकॉर्ड तपासले. पण त्यात काहीच ठोस आढळले नाही. १९३१ पूर्वीच्या जनगणनेची घरयादी या पथकाला मिळाली नाही. ही यादी अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. पथकाला जे दस्तऐवज सापडले, ते त्यांनी आणले असून त्यापैकी बरेच रेकॉर्ड फारशी भाषेत आहेत. त्यामुळे ते समजून घेण्यासाठी ते भाषांतरित केले जात आहेत. या दस्तऐवजात कुणबीचा कोणताही संदर्भ आढळला नाही, असे सांगण्यात येत आहे.
