
पुणे : विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांची अजित पवारांवरील टीका भाजपच्या अंगलट आली आहे. या टिकेवर अजित पवार गटाने आक्रमक भूमिका घेतल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर माफी मागण्याची पाळी आली आहे. “उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मन दुखावले गेले असेल, तर मी त्यांची माफी मागतो,” अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली. (BJP State President Chandrashekhar Bawankule) पुणे शहर भाजपच्या कार्यकारिणीत उपस्थित असलेल्या बावनकुळेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली. आमदार पडळकर यांनी ‘लबाड लांडग्याचे लबाड पिल्लू’ या शब्दांत अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्याचे संतप्त पडसाद अजित पवार गटात उमटले व अजित पवार गटाच्या नेत्यांकडून भाजपला इशाराही देण्यात आला होता. आता त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी भूमिका स्पष्ट केली. बावनकुळे म्हणाले, पडळकर यापूर्वीही बोलले होते, तेव्हा त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्यासह मी समज दिली होती. प्रत्येक राजकीय नेत्याला प्रतिष्ठा असते आणि तिला धक्का लावण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
पडळकरांच्या वक्तव्याने कुणाचे मन दुखावले असेल तर मी माफी मागतो, असे बावनकुळे म्हणाले. कोणत्याही पक्षातील नेत्यांवरील अनुचित वक्तव्य भाजपने कधीच मान्य केलेली नाहीत, असेही ते म्हणाले.