ओबीसी आंदोलन सुरूच राहणार, आमरण उपोषण स्थगित

0

नागपूर – मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र, मराठ्यांचे ओबीसीकरण खपवून घेणार नाही असा इशारा देत ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे  यांनी सरकारकडून ठोस निर्णय झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असे आज पुन्हा एकदा जाहीर केले. यापूर्वी रविवारपर्यंत सरकारने बैठकीसाठी न बोलावल्यास सोमवारपासून  आमरण उपोषण करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र, सध्यास्थितीत तो निर्णय स्थगित करण्यात येत असला तरी साखळी उपोषण नियमित सुरू राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. आज माजी राज्यमंत्री परिणय फुके , माजी आमदार सुधाकर कोहळे, आशिष देशमुख 29 रोजी बैठकीचे निमंत्रण पत्र देण्यासाठी आले. शासनाने गठीत केलेल्या समितीत कुणबी, ओबीसी प्रतिनिधीचा समावेश करावा,जातनिहाय जनगणना व्हावी, ओबीसी आरक्षण मर्यादा 50 टक्केपेक्षा अधिक वाढीसाठी केंद्र सरकारला शिफारस करावी आदी मागण्यांकडे लक्ष वेधले. सरकारकडून सर्वांचे समाधान झाल्यास ठीक अन्यथा सकारात्मक पवित्रा न आल्यास आज आहे त्यापेक्षाही अधिक उग्र आंदोलन नागपूर, चंद्रपूर नव्हे तर राज्यभरात केले जाईल असा इशारा देण्यात आला. यासंदर्भात पुढील धोरणात्मक निर्णय 29 रोजी जाहीर करण्यात येईल असेही आज डॉ तायवाडे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा