
नागपूर-शुक्रवारी मध्यरात्रीनंतर विजांचा कडकडाट आणि अक्षरशः धो-धो पावसानं नागपूरकरांचा थरकाप उडविला. विजांचा कडकडाट असा काही होता की शहरात भीतीचं वातावरण तयार झालं. अवघ्या काही तासांतच शहरात ११६.५ मि.मी. पाऊस बसरल्याची माहिती हवामान खात्याच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विजांच्या कडकडाटामुळे इमारतींना हादरे बसत होते. आवाजानं जागे झालेले लोक अक्षरशः जीव मुठीत धरून निसर्गाचं हे रौद्र रुप भेदरलेल्या नजरेनं बघत होते. रस्ते जलमय झाले होते. सीताबर्डी, धंतोली, प्रतापनगरसह अनेक वस्त्यांमधील रस्त्यांना नदीचं स्वरुप आलं होते. सीताबर्डीवरील मोरभवन बसस्थानकावर उभ्या बसगाड्या, इतर अनेक वस्त्यांमध्ये रस्त्यावर उभ्या कार व इतर वाहनं पाण्यात बुडाल्याचे चित्र दिसून आले. शहरातील आपात्कालीन नियंत्रण कक्षाला रात्रीच फोन सुरु झाल्याने यंत्रणा सतर्क झाली. पहाट सुरु होताच अनेक ठिकाणी रस्त्यांवर बोटी दिसू लागल्या. सकाळीच स्वतः जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे देखील रस्त्यावर होते. सिमेंटच्या उंचच उंच रस्त्यांमुळे खोलगट भागात गेलेल्या घरांमध्ये पाणी शिरल्याने लोकांपुढे मोठेच संकट निर्माण झाले. अनेक वस्त्यांमध्ये नागरिकांना बोटीनं रेस्क्यू करावे लागले. त्यात अनेक वरीष्ठ नागरिकांचा समावेश होता. घरात पाणी शिरले असताना घरात एकटेच असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे हाल झाल्याचे दिसून आले. त्यांच्यापैकी अनेकांना मदतीचा हात देण्यात आला.
नरेंद्र नगर अंडरब्रिज नेहमीप्रमाणे तुडूंब भरल्याने वाहतुकीसाठी बंद झाला होता. नाग नदीच्या समांतर असलेला ग्रेटनागरोड देखील बराच काळ वाहतुकीसाठी बंद होता. विशेषतः रेल्वे पुलाच्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने त्यातून वाहने काढणं अशक्य होत होतं.
शाळा, महाविद्यालयांना सुटी
शहरातील परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने शाळा व महाविद्यालयांना शनिवारी सुटी जाहीर केली आहे. दरम्यान, शुक्रवारच्या ऑरेंट अॅलर्टनंतर शनिवारीही विदर्भाच्या बहुतांशी जिल्ह्यांसाठी यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.
रेल्वेस्थानक, बसस्थानक जलमय
पावसाचा तडाखा इतका जबरदस्त होता की मुख्य रेल्वेस्थानकाला देखील नदीचे स्वरुप आले होते. त्यामुळे अनेक रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक प्रभावित झाले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अद्याप रेल्वेकडून त्याबाबत दुजोरा मिळालेला नाही. बसस्थानकावर देखील नेमकी हीच परिस्थिती होती.
