
हैदराबाद-एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपसाठी भारतात असलेल्या पाकिस्तानी क्रिकेट संघाचा फलंदाज मोहम्मद रिझवान याने हमास आणि इस्त्रायल युद्धात हमासला पाठिंबा दर्शविणारे ट्विट केल्याने वाद निर्माण झाला आहे. रिझवानने श्रीलंकेविरुद्धचा विजय गाझामधील पॅलेस्टिनींना समर्पित केला.
सध्या इस्त्रालय आणि हमासमध्ये युद्ध सुरु आहे. हमासच्या हल्ल्यात शेकडो इस्त्रायली नागरिक मृत्यूमुखी पडल्यावर इस्त्रायलने हमासविरुद्ध युद्ध छेडले आहे. त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. वर्ल्ड कपच्या निमित्ताने भारतात असलेल्या पाकिस्तान संघातील फलंदाज मोहम्मद रिझवानने श्रीलंकेच्या धावांचा पाठलाग करताना १२१ चेंडूत नाबाद १३१ धावा करून संघाला विजय मिळवून दिला. मात्र, या खेळीनंतर मोहम्मद रिझवानने ट्वीटरवर एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट क्रिकेटविषयी नसून हमास आणि इस्रायल युद्धाविषयी आहे. मोहम्मद रिझवानने हमासला पाठिंबा दर्शविला. त्याने श्रीलंकेविरुद्धचा विजय गाझामध्ये स्थायिक झालेल्या पॅलेस्टिनी लोकांना समर्पित केला. “हे गाझामधील आमच्या भावा-बहिणींसाठी होते”, असे त्याने नमूद केले आहे.

दरम्यान, आयसीसीने रिझवानवर कारवाई करावी, अशी मागणी क्रिकेट फॅन्सनी केली आहे. टीव्ही अँकर विक्रांत गुप्ता यांनी या गोष्टीला परवानगी आहे का, असा प्रश्नच आयसीसीला केला आहे. २०१९ च्या आयसीसी वर्ल्ड कपमध्ये महेंद्रसिंह धोनी याला ग्लोव्हजवरील इंडियन आर्मी इन्सिग्निया काढून टाकण्यास सांगण्यात आले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.