
इस्लामाबाद-पंजाबच्या पठाणकोट येथील वायूदलाच्या तळावरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार शाहीद लतीफ याची पाकिस्तानात हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. (Kingpin of Pathankot Attack killed in Sialkot) पठाणकोटच्या हल्ल्यात सात भारतीय जवान शहीद झाले होते. शाहीद हा पाकिस्तानच्या गुजरानवाला भागातला रहिवासी होता. तो अनेक वर्षांपासून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होता. तो जैशच्या सियालकोट सेक्टरचा कमांडर होता. भारतात दहशतवादी पाठवणे, हल्ले घडवून आणणे, दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणे, हल्ल्यांची योजना आखणे, इत्यादी कामं लतीफ करत होता. पठाणकोट हल्ल्याची योजनाही त्यानेच आखली आणि त्यानेच दहशतवाद्यांना भारतात पाठवले होते.
लतीफ हा एनआयएच्या मोस्ट वॉन्टेड यादीत होता. त्याचीच पाकिस्तानमध्ये हत्या करण्यात आली आहे. सियालकोट येथे काही अज्ञातांनी त्याची गोळ्या घालून हत्या केली आहे. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार सियालकोटजवळच्या एका मशिदीत शाहीदची हत्या करण्यात आली. दोन हल्लेखोर मोटारसायकलवरून आले व त्यांनी शाहीदवर गोळ्या झाडल्या आणि तेथून फरार झाले. या हत्याकांडानंतर पोलिसांनी सियालकोट भागात नाकाबंदी केली आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी सर्च ऑपरेशन हाती घेतले आहे.