
छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर रविवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघात प्रकरणी आरटीओच्या दोन अधिकाऱ्यांसह तिघा जणांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आलीय. या अपघातात १२ प्रवासी मृत्यूमुखी पडले होते तर अनेक जण जखमी झाले आहेत. एका ट्रकला पाठीमागून बस धडकल्याने हा अपघात झाला होता. हा ट्रक आरटीओने थांबविल्याचे स्पष्ट झाल्याने दोन अधिकाऱ्यांसह चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे संभाजीनगरचे पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी सांगितले. (Samruddhi Highway Accident) दोन्ही आरटीओ अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले असल्याची माहिती आरटीओ कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
टेम्पो ट्रॅव्हल्स चालक कमलेश लहू म्हस्के यांच्या फिर्यादीवरून आरटीओ अधिकारी प्रदीप छबुराव राठोड, नितीशकुमार सिद्धार्थ बोरणारकर आणि ट्रक चालक ब्रिजेशकुमार कमालसिंग चंदेल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री बारा ते एकच्या दरम्यान समृद्धी महामार्गावर बुलढाण्याहून नाशिककडे जाणाऱ्या प्रवाशांच्या गाडीचा आणि ट्रकचा भीषण अपघात झाला होता. नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी आणि इंद्रानगर येथील रहिवासी बुलढाणा येथील सैलानी बाबांचे दर्शन करून रविवारी खाजगी बसने नाशिककडे जात होते.