
मुंबई- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून २२ जागांवर दावा करण्याचे संकेत मिळाले आहेत. शिवसेनेने मागील निवडणुकी लढविलेल्या २२ जागांवरच शिंदे गटाकडून दावा सांगण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दुसरीकडे भाजपने शिंदे गटासाठी १३ जागा सोडण्याची तयारी दर्शविल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेचे १३ खासदार शिंदे गटात आले आहेत. त्यामुळेच भाजपने ही भूमिका घेतल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सोबत आल्याने या गटासाठीही महायुतीत जागा सोडाव्या लागणार असल्याने (Lok Sabha Elections Seat Sharing) महायुतीतील जागावाटप एक मोठे आव्हान ठरणार असल्याचे मानले जात आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर शिंदे गटाच्या १३ खासदारांची बैठकही झाल्याचे सांगण्यात येत आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रक्षाने अद्याप त्यांची भूमिका जाहीर केलेली नाही. या संदर्भात शिंदे गट, भाजप आणि अजित पवार गट एकत्र चर्चा करून मार्ग काढेल, अशी भूमिका शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिली आहे.
एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापनेचा निर्णय घेतला तेव्हा, त्यांच्यासोबत आलेल्या खासदारांच्या जागा शिवसेनेसाठी सोडण्यास भाजप तयार आहे. इतकेच नाही तर युतीच्या काळात शिवसेनेच्या वाट्याला असलेल्या जागा देखील शिवसेनेकडेच देण्यावर भाजपची तयारी आहे. मात्र, पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने या बाबत कोणतीच भूमिका स्पष्ट केलेली नाही. यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी समर्थक तेरा खासदारांची बैठक झाली.
