
(Buldhana)बुलढाणा – जिल्ह्यात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून तात्काळ जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा व यलो मोझॅकमुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीबाबत हेक्टरी ५०००० रुपये मदत द्यावी, सोबतच शेतमालाला हमीभाव देऊन मागील वर्षीचे अतिवृष्टीचे अनुदान तात्काळ अदा करण्यात यावे, शासकिय शाळा महाविद्यालयाचे खाजगीकरण न करणे, शासकिय सेवेचे कंत्राटीकरण तात्काळ रद्द करावे, शहीद अग्नीवीर यांना शासकिय मानवंदना देण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी आज शिवसेना (Uddhav Balasaheb Thackeray)(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने उपविभागीय अधिकारी कार्यालय खामगाव येथे घोषणाबाजी करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून तहसील कार्यालयावर मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधले.
मागील वर्षीची अतिवृष्टीची मदत अद्याप शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही ती तात्काळ देण्यात यावी, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकरी जगला तर आपण जगू शकतो, याची जाणीव सर्वांना आहे. सोबतच सरकारी शाळा महाविद्यालयांचे खाजगीकरण, कंत्राटीकरण करण्यात येऊ नये. यामुळे विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे खूप मोठे नुकसान होणार आहे. खाजगीकरणामुळे शैक्षणिक धोरण पूर्णपणे बदलणार आहे, म्हणून हा निर्णय आपण रद्द करावा, जे उमेदवार भारतीय सैन्य दलात अग्नीवीर म्हणून नोकरीस लागले आहेत, ते शहीद झाल्यानंतर त्यांना शासकिय मानवंदना देण्यात येत नाही, ही बाब लक्षात आली आहे. मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल व याला सर्व जबाबदार सरकार राहील, याची नोंद घ्यावी असा गंभीर इशारा सुद्धा त्यांनी यावेळी (Narendra Khedkar)नरेंद्र खेडकर (जिल्हा संपर्क प्रमुख) यांनी दिला.
