
मुंबई-ड्रग माफिया ललित पाटील आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील संभाव्य संबंधांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बोट ठेवले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ललित पाटीलची चौकशी का झाली नाही? यामागील कारण काय होते? या सगळ्याला उद्धव ठाकरे जबाबदार होते की गृहमंत्री जबाबदार होते? ललित पाटीलची चौकशी न करण्यासाठी कोणाचा दबाव होता? या प्रकरणात खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. पण मी त्या आत्ताच सांगणार नाही, असे सांगत देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणातील सस्पेन्स कायम ठेवला.
ललित पाटील प्रकरणावरुन ठाकरे गटाकडून शिंदे गटातील मंत्र्यावर आरोप केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी आज ठाकरे गटाला आरोपीच्या पिंजऱ्यात आणले. फडणवीस म्हणाले की ललित पाटील याला डिसेंबर २०२० मध्ये अटक झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होते. उद्धव ठाकरे यांनीच ललित पाटील याच्याकडे तेव्हाच्या शिवसेनेचे नाशिक जिल्ह्याचे प्रमुखपद सोपवले होते. ललित पाटील याला अटक झाल्यावर लगेच पीसीआर मागण्यात आला. गुन्हा मोठा असल्याने याप्रकरणात लगेच पीसीआर देण्यात आला. ललित पाटील याला पीसीआर मिळाल्याबरोबर त्याला लगेच ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर सरकारी पक्षाकडून ललित पाटीलच्या चौकशीसाठी कोणताही अर्ज करण्यात आला नाही. पोलिसांकडून ललित पाटील याची चौकशीच झाली नाही. पीसीआरचा १४ दिवसांचा कालावधी संपल्यानंतर ललित पाटील याला एमसीआर द्यावा लागला. या काळातही त्याची चौकशीच झाली नाही. चौकशी झाली नसेल तर उद्या एखाद्या आरोपीविरुद्ध न्यायालयात खटला भरायला झाला तर तो कसा भरणार?, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला.