पोंभुर्ण्यात आंदोलन आदिवासींचं पण, राजकारण कोणाचं?

0

 

चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा येथे सुरू असलेल्या आदिवासींच्या आंदोलनातून वेगवेगळ्या मागण्या मांडल्या जात असल्या तरी गेला आठवडाभर चाललेल्या या आंदोलनाचा आणि आदिवासी बांधवांच्या भावनांचा वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याविरुद्ध राजकीय वातावरण तापवण्यासाठी गैरवापर केला जातो आहे का, अशी शंका व्यक्त होऊ लागली आहे.
दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मध्यस्थी करण्यासाठी म्हणून घेतलेला पुढाकार आणि त्यासाठी सोमवारी पोंभुर्ण्याला दिलेली भेट, यामुळे तर या आंदोलनामागील राजकारण अजूनच चर्चेत आलं आहे.
पोंभुर्ण्यात गेले आठ दिवस आदिवासी बांधवांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे. पोंभूर्णा इथं उभारण्यात आलेल्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इको पार्क मध्ये आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे पुतळे हे आदिवासींची अवमानना करणारे आहेत असा आक्षेप घेत, ते पुतळे हटवण्याची मागणी केली जाते आहे. या पार्कचं नाव‌ बदलण्याच्या मागणीसह, दोषींवर कारवाई करण्याची, या परिसरातील आदिवासीबहुल गावं पेसा कायद्यांतर्गत समाविष्ट करण्याची आणि गावकऱ्यांना वन जमिनीचे पट्टे देण्याची देखील मागणी केली जाते आहे. त्यासाठीच आठवडाभर ठिय्या आंदोलन सुरू आहे.
या आंदोलनाचा वापर पडद्याआडून राजकारणासाठी केला जात असल्याची चर्चा सुरू असतानाच विजय वडेट्टीवार यांनी मध्यस्थी करण्याचं निमित्त करून मैदानात उडी घेतली आहे. तर दुसरीकडे, ज्यांच्या पुढाकारानं हे आंदोलन सुरू झालंय्, ते जगन येलके हे एका शाळेत कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे. शासकीय वेतन घेऊन सरकारच्याच विरोधात आंदोलन उभारण्याची त्यांची रीत आणि त्याकडे दुर्लक्ष करणारे शासन-प्रशासन, या साऱ्याच गोष्टी, या आंदोलनामागील राजकारण अधोरेखित करणाऱ्या ठरताहेत….

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा