भावी पिढ्यांपर्यंत शास्त्रीय संगीत पोहचणे आवश्यक- शंकर महादेवन

0

 

नागपूर, 24 ऑक्टोबर : शास्त्रीय संगीत भावी पिढ्यांपर्यत पोहचणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ख्यातनाम गायक पद्मश्री शंकर महादेवन यांनी केले. नागपुरात आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजया दशमी उत्सवात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, प्रांत संघचालक राम हरकरे आणि महानगर संघ चालक राजेश लोया प्रामुख्याने उपस्थित होते.

 

याप्रसंगी शंकर महादेवन यांनी संघ, राष्ट्र व संगीतावर भाष्य केले. काही अनुभव हे आयुष्याला दिशा दाखविणारे असतात. संघाची देशाप्रति असलेली निष्ठा व काम हे प्रेरणादायी आहे. अखंड भारताचा विचार, संस्कृतीचे संवर्धन करण्यात संघाचे मौलिक योगदान आहे. आपल्या वैभवशाली देशात संगीताचा मोठा ठेवा आहे. आपल्या संस्कृतीने जगाला विश्वशांतीचा मंत्र दिला आहे. वर्तमान व भविष्यातील पिढ्यांपर्यंत याचे महत्त्व पोहोचविले पाहिजे. भारतीय नागरिकांनी देशाच्या परंपरेला आपल्या कामातून सम्मान दिला पाहिजे. प्रत्येकाने स्वतःच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करत पुढील पिढ्यांसमोर आदर्श प्रस्थापित करण्यावर भर दिला पाहिजे असे महादेवन म्हणाले. जेव्हा गाणे बनवतो तेव्हा पुढील पिढ्यांपर्यंत शास्त्रीय संगीत कसे जाईल याचा प्रयत्न असतो. जेव्हा संधी मिळेल तेव्हा असा पुढाकार सर्वांनीच घेतला पाहिजे. आपल्या सर्वांचे हे कर्तव्यच आहे. संघाचे घोषपथक हेच काम करत असल्याचे दिसून येते. सुमारे 11 वर्षांपूर्वी माझी एकेडमी सुरू झाली आणि नव्वदहून अधिक देशांत शास्त्रीय संगीत शिकवतो आहे. आपल्या संगीताचा अभिमान बाळगला पाहिजे. ज्याप्रमाणे एखाद्या गीतात सरगम प्राण ओतते, त्याचप्रमाणे देशात कुठलीही समस्या असते तेव्हा स्वयंसेवक त्याच्या मागे ती सोडविण्यासाठी उभे राहून काम करतात. भारताला आता संपूर्ण जग आदराच्या नजरेने पाहत असल्याचे महादेवन यांनी यावेळी सांगितले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा