
नागपूर : विजयादशमी आणि धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त नागपुरात आलेल्या भाविकांनी विजयादशमीच्या दिवशी दिवसभर मेट्रोने प्रवास करण्यास प्राधान्य दिले. काल मध्यरात्रीपर्यंत सर्व मेट्रो स्टेशनवर प्रवाश्यांनी भरभरून गर्दी केली होती. एका दिवसाची प्रवासी संख्या १,१२,९१३ इतकी नोंद करण्यात आली. बुधवारी देखील प्रवाश्यांची संख्या वाढत होती.
नवरात्र, गरबा, दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिवसांच्या निमित्ताने आणि रात्री उशिरापर्यंत भाविकांना वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महा मेट्रोने तीन दिवस मध्यरात्रीपर्यंत मेट्रो सेवा चालवली. वेळेत वाढ झाल्याचा फायदा नागरिकांनी घेतला. धम्मचक्र प्रवर्तन आणि दसऱ्याच्या दिवशी सर्वच मेट्रो स्थानकांवर प्रवाशांची गर्दी होती. २४ ऑक्टोबर रोजी सुमारे १ लाख १३ हजार (१,१२,९१३ ) लोकांनी मेट्रोने प्रवास केला. २२ आणि २३ ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्सवात शहरातील विविध भागात मध्यरात्रीपर्यंत गरबा-दांडिया साजरा करण्यात आला. रात्रीच्या वेळी बहुतांश लोकांनी खासगी वाहनांऐवजी मेट्रोने प्रवास केला.

• भक्तांचा ओघ सतत चालू होता
धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सोमवारपासूनच देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविकांचे आगमन सुरू झाले होते. खापरी, न्यू एअरपोर्ट, एअरपोर्ट, एअरपोर्ट साऊथ, उज्ज्वल नगर, जयप्रकाश नगर, छत्रपती नगर, रहाटे कॉलनी, काँग्रेस नगर, झिरो माईल, कस्तुरचंद पार्क, वर्धा मार्गावरील नारी मेट्रो स्टेशन या ऑरेंज लाईन मेट्रो स्टेशनवर रात्री उशिरापर्यंत वाहतूक सुरू होती. . दीक्षाभूमी ते नागलोक आणि ड्रॅगन पॅलेस (कामठी) येथे जाणाऱ्या भाविकांनी मेट्रोने ऑटोमोटिव्ह चौक स्टेशन गाठले आणि पुढील प्रवास रस्त्याने पूर्ण केला. अॅक्वा लाईनच्या लोकमान्य नगर, बन्सी नगर, सुभाष नगर, धरमपेठ कॉलेज, शंकर नगर, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्स, झाशी राणी, कॉटन मार्केट रेल्वे स्टेशन, आंबेडकर चौक, प्रजापती नगर या मेट्रो स्थानकांवर प्रवाशांची गर्दी होती. महामेट्रोकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती.
दररोज सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत दर १० मिनिटांच्या अंतराने मेट्रो सेवा सुरू आहे. मेट्रो प्रवाशांच्या सोयीसाठी महामेट्रोने पिपळफाटा, बेसा, म्हाळगीनगर, नरेंद्रनगर ते छत्रपतीनगर मेट्रो स्टेशनपर्यंत फीडर बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. याचा फायदा मेट्रो रेल्वे सेवेला होत आहे. खापरी मेट्रो स्टेशनपासून एम्स आणि मिहानपर्यंत फीडर सेवेच्या उपलब्धतेमुळे नोकरदार वर्गाकडून मेट्रोचा वापर वाढला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रत्येक मेट्रोवर सायकल आणि ई-रिक्षांची व्यवस्था करण्यात आली आहे.