नीलेश राणेंची राजकारणातून निवृत्ती, भाजपमध्ये धावपळ

0

मुंबई MUMBAI : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पूत्र नीलेश राणे यांनी मंगळवारी राजकारणातून निवृत्ती घेतल्याची घोषणा करुन खळबळ माजवून दिली. एक्सवरुन पोस्ट करत त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे कारणही स्पष्ट केले आहे. “मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे. आता राजकरणात मन रमत नाही. इतर काही कारण नाही”, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या निवृत्तीचा अनेकांना धक्का बसला आहे. दरम्यान, निलेश राणे हे फडणवीस यांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती आहे. (Nilesh Rane announced retirement from active politics)
राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. निलेश राणे यांनी म्हटले आहे की, “मागच्या १५-२० वर्षांमध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिले. कारण नसताना माझ्या सोबत राहिलात, त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे.

भाजपमध्ये खूप प्रेम मिळाले आणि भाजपसारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली, त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे. मी एक लहान माणूस आहे, पण राजकरणात खूप काही शिकायला मिळाले आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचे मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणे वगैरे यात मला आता रस राहिलेला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा. जय महाराष्ट्र!”, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, आज मंत्री रवींद्र चव्हाण यांनी निलेश राणे यांची भेट घेतली. या दोघांमध्ये तब्बल तीन तास चर्चा झाल्याची माहिती असून दोघेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांचया भेटीला रवाना झाल्याची माहिती आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा