नागपूरमध्ये राष्ट्रीय डिझाईन संस्था स्थापन करा : विशाल मुत्तेमवार

0

 

– पीयूष गोयल यांचेकडे पत्राद्वारे मागणी

(nagpur)नागपूर – भारत देशाला कलाकौशल्यांची प्राचीन परंपरा लाभली आहे. त्यामुळेच आपला देश विविध कलाकौशल्यांचे माहेरघर समजला जातो. या कलाकौशल्यांना व्यावसायिक स्वरूप देऊन रोजगार संधी निर्माण करण्यासाठी गुजरातमधील अहमदाबाद येथे सन 1961 मध्ये राष्ट्रीय डिझाईन संस्थेची (एनआयडी) स्थापना करण्यात आली. मात्र, देशाचे हृदयस्थान असलेल्या व प्रगतीकडे वाटचाल करणा-या नागपूर शहरात एनआयडी अजूनही सुरू झालेली नाही. त्यामुळे स्थानिक युवकांचे भविष्य व रोजगाराबाबत स्वयंपूर्णतेचा विचार करून केंद्र सरकारने नागपूर येथे एनआयडी स्थापन करण्याची मागणी (State Congress Committee General Secretary Vishal Muttemwar)प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव विशाल मुत्तेमवार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहिले आहे.

सन 1961 नंतर देशात गांधीनगर, बेंगलुरू या शहरांसह हरियाना, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि आसाम या राज्यांमध्ये एनआयडी सुरू झाली. भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्यभागी असल्याने आणि आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात गतीने विस्तारणा-या नागपूर शहरात एनआयडी स्थापन व्हायला हवी होती. परंतु अद्याप हा विषय दुर्लक्षित राहिल्याबद्दल विशाल मुत्तेमवार यांनी आश्चर्य व्यक्त केले.

नागपूरमध्ये विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (व्हीएनआयटी), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एआयआयएमएस) या महत्त्वाच्या प्रशिक्षण संस्था आहेत. त्यामुळे एनआयडीची स्थापना झाल्यास ही संस्था चौथा आधारस्तंभ म्हणून भूमिका बजावेल. याशिवाय कुशल मनुष्यबळाची निर्मिती होऊन स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होतील. या संस्थेमुळे व्यवसायाला चालना मिळेल, तसेच भविष्यात विविध उद्योगांना आकर्षित करून उपराजधानीत गुंतवणूक वाढीसाठी मदत होईल. येथील युवकांचे रोजगाराच्या निमित्ताने होणारे स्थलांतर थांबेल, असा विश्वास मुत्तेमवार यांनी व्यक्त केला.
विदर्भ क्षेत्राचा विकास व स्थानिक युवकांच्या रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या विषयाची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.

 

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा