माजी केंद्रीय मंत्री संघर्षशील नेता बबनराव ढाकणे यांचे निधन

0

* शनिवारी होणार अंत्यसंस्कार

अहमदनगर, २७ ऑक्टोबर  : माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव दादाबा ढाकणे यांचे निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. गेल्या तीन आठवड्यांपासून ते न्युमोनिया आजाराने ग्रस्त होते. दरम्यान गुरुवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुलगा प्रतापराव ढाकणे, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे राज्यातील एक संघर्षशील नेता काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

त्यांच्यावर अहमदनगरच्या साईदीप रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्रकृती खालावली आणि गुरुवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाल्याची माहिती रुग्णालयाचे प्रमुख डॉ. एस.एस.दीपक यांनी माध्यमांना दिली.

ढाकणे यांचे पार्थिव उद्या, शनिवार दुपारी एक वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. शनिवारी दुपारी दोन वाजता पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

बबनराव ढाकणे यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1937 मध्ये दुष्काळी पाथर्डी तालुक्यातील अकोले या छोट्याश्या गावात एका शेतकरी कुटूंबात त्यांचा जन्म झाला होता. घरातून कोणताही राजकीय वारसा नव्हता. बीड लोकसभा मतदारसंघातून जनता दलातर्फे ते लोकसभेवर निवडून गेले होते. याआधी त्यांनी गोवा मुक्तिसंग्रामातही सहभाग घेतला होता. बबनराव ढाकणे तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये ऊर्जा संसाधन मंत्री होते. ढाकणे हे चार वेळा आमदार आणि एक वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. राज्यात आणि केंद्रात त्यांनी विविध मंत्रीपदे भूषवली होती.

बबनराव ढाकणे यांनी विद्यार्थी दशेतच थेट दिल्लीला जाऊन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची 1951 मध्ये भेट घेतली होती. हे त्यांच्या आयुष्यातील पहिले आंदोलन ठरले. महाराष्ट्रात 1994 साली पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राहिले होते. शिक्षणासाठी पाथर्डीच्या हिंद वसतिगृहात राहताना चळवळीत ओढले गेले. गोवामुक्ती संग्रामात भाग घेण्यासाठी शाळा नववीत असताना सोडून दिली.

8 जुलै 1968 रोजी महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्री कुठल्यातरी महत्वाच्या विषयावर बोलत होते. अचानक प्रेक्षक गॅलरीतून कसलासा आवाज झाला. खाली बसलेल्या आमदारांवर पत्रकांचा वर्षाव होऊ लागला. जोरदार घोषणाबाजी सुरू होती. गॅलरीतून खाली उडी मारायचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला पकडले होते. ते बबनराव ढाकणे होते, तेव्हापासून बबनराव ढाकणे हे नाव चर्चेत आले. त्यानंतर एका उडीच्या प्रयत्नाने पाथर्डी तालुक्यातील अनेकांचे भविष्य उजळले. पुढे राजकीय जीवनात उतरायचे ठरवले आणि काँग्रेसच्या विचारांकडे ते ओढले गेले. 1958 साली यशवंतराव चव्हाण भगवानगडावर आले होते. तेव्हा त्यांची ओळख झाली. या आधी त्यांनी गोवा मुक्तिसंग्रामात भाग घेतला होता.

1967 साली राजकारणात पाऊल ठेवत टाकळीमानूर गटातून त्यांनी जिल्हा परिषदेसाठी निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. पाथर्डी विधानसभा मतदारसंघातुन ते 1978 साली पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. पुढे पुलोद मंत्रीमंडळात बांधकाम राज्यमंत्री, तर 1979 पुलोद ग्रामविकास मंत्री म्हणूनही काम पाहिले. 1989 साली विधानसभेचे उपाध्यक्ष असताना त्यांनी 10 नोव्हेंबर 1989 साली बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जनता दलतर्फे नवव्या लोकसभेवर निवडून गेले.

ऊस तोडणी कामगारांचे नेते म्हणूनही ते परिचित होते. पाथर्डी तालुक्यातील अकोले सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदापासून थेट केंद्रीय मंत्रीपदापर्यंत त्यांनी झेप घेतली होती. संघर्षयोद्धा म्हणून ते ओळखले जात असत. त्यांच्या निधनानंतर भावना व्यक्त करताना त्यांचे चिरंजीव अॅड. प्रताप ढाकणे म्हणाले, ते माझे वडील होते, पण त्यापेक्षा जास्त माझे ते गुरू होते. मला घडवून माझ्यात संघर्ष रुजवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या जाण्याने मी पोरका झालो आहे, असे प्रतापराव ढाकणे यांनी म्हटले.

जनता दल, जनता पार्टी, पुन्हा काँग्रेस, शेतकरी विचार दल व राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षांमध्ये त्यांनी काम केले. ऊस तोडणी कामगार, शेतकरी, बेरोजगारी अशा विविध विषयांना त्यांनी हात घातला.

ढाकणे यांचा पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, व्ही. पी. सिंग अशा मोठ्या नेत्यांचा सहवास त्यांना लाभला होता. माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांचा पुतळाही त्यांनी पाथर्डीत उभारला होता.

गेल्या वर्षीच त्यांच्या जीवन कार्यावरील ‘महाराष्ट्र विधान मंडळातील बबनराव ढाकणे’ हे पुस्तक प्रकाशित झाले होते. या कार्यक्रमाला लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी ढाकणे यांनी केलेले भावनिक भाषणही चांगलेच गाजले होते.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा