केंद्रीय मंत्री श्री पुरी यांच्या हस्ते UMI येथील महा मेट्रो स्टॉलचे उद्घाटन

0

● १६ वे ३ दिवसीय यूएमआय राष्ट्रीय परिषद दिल्ली येथे सुरु

 

नागपूर: अर्बन मोबिलिटी इंडिया (UMI) परिषदेच्या १६ व्या आवृत्तीचे आज दिल्ली येथे उद्घाटन झाले. या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्री श्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते झाले, तर या कार्यक्रमाला श्री मनोज जोशी सचिव – (केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास) प्रामुख्याने उपस्थित होते.

या राष्ट्रीय परिषदेच्या अंतर्गत आज महा मेट्रो स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. केंद्रीय मंत्री श्री पुरी यांच्या हस्ते महा मेट्रोच्या नागपूर आणि पुणे प्रकल्पांच्या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. महा मेट्रोने नागपूर आणि पुणे येथील प्रकल्पांतर्गत असलेल्या विविध विषयांचे चित्रण येथे केले आहे, ज्यात मालमत्ता विकास (पीडी), आर्थिक सुनिश्चीतता, प्रकल्पात राबवलेली वॉटर हार्वेस्टिंग आणि इतर तत्सम संकल्पनांचा समावेश आहे.

मेक इन इंडिया अल्युमिनिअम बॉडी कोच, मेट्रो प्रकल्पाची उपयुक्तता सर्व सामान्यांना समजावण्याकरता आयोजित होत असलेले मेट्रो संवाद, मेट्रोनियो प्रकल्प, महा मेट्रोने आजवर मिळवलेले विविध पुरस्कार असे काही निवडक विषय छायाचित्राच्या माध्यमाने प्रदर्शित केले आहेत. या स्टॉलला चांगला प्रतिसाद मिळत असून या येथील निमंत्रित आणि इतर या स्टॉलला आवर्जून भेट देत आहेत.

या तीन दिवसीय परिषदेचे उद्घाटन करताना केंद्रीय मंत्री श्री पुरी यांनी वाहतूक आणि मेट्रो रेल संबंधी विविध पैलूंवर भाष्य केले. १९७२ पासून कलकत्त्याला मेट्रो सुरु झाल्यापासून मेट्रो विकास आणि गेल्या काही वर्षातला मेट्रो विकास हा तुलनात्मक गतिमान आणि दर्जेदार आहे. आम्ही दिवसेंदिवस तंत्रज्ञानात भर घालत अनेक शहरांना दर्जेदार मेट्रो सेवा प्रदान करण्यात यशस्वी झालो आहे. भविष्यात वैयक्तिक गाड्यांची संख्या रस्त्यावरून कमी करून सार्वजनिक वाहतुकीचा वापर नागरिकांनी स्वीकारावा ह्यासाठी आमचे प्रयत्न असेल.

मेट्रो क्षेत्रात आजपेक्षा अधिक चांगली प्रगती करण्याचा आमचा मानस आहे. ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेला परिवहन क्षेत्राने खूप चांगला प्रतिसाद दिला असून नागरिकांनी त्याचा स्वीकार केला आहे, असे सांगत देशाच्या विकासासाठी ही एक चांगली गोष्ट आहे, असेही ते म्हणाले. आपल्या भाषणात श्री मनोज जोशी यांनी लास्ट आणि फर्स्ट माईल कनेक्टिविटी वाढवण्यावर भर दिला. मेट्रोची प्रवासी संख्या वाढवण्याकरता हा महत्वाचा भाग असल्याचे ते म्हणाले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा