रोगविरहित लिंबूवर्गीय रोपे शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्या -केंद्रीय मंत्री गडकरी यांचे आवाहन

0

 

नागपूर NAGPUR  : संत्रा हे विदर्भातील शेकऱ्यांसाठी एक महत्वाचे पीक असून संत्र्यावर नागपूर सोबतच देशात विविध संशोधन संस्था नवनवीन संशोधन करीत आहे. देशातील संत्रा ,मोसंबी आणि लिंबू उत्पादकांची मुख्य समस्या ही उत्पादनाची गुणवत्ता असून शेतकऱ्यांना रोगविरहित , उच्च दर्जाची , भरघोस उत्पादन क्षमता असणारी लिंबूवर्गीय फळांची रोपे मिळावी यासाठी संशोधन संस्थांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी इंडियन सोसायटी ऑफ सिट्रीकल्चर , भारतीय कृषी संशोधन परिषद आणि केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था ,नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘एशियन सीट्रस काँग्रेस 2023 ‘ Asian Citrus Congress 2023  ,या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी नागपूरमध्ये आज केले.

एशियन सिट्रस काँग्रेस परिषद 2023, आशियातील लिंबूवर्गीय उद्योगाच्या प्रगतीसाठी एक समर्पित आणि अद्वितीय कार्यक्रम आखणार असून निंबूवर्गीय क्षेत्रातील सर्व घटकांना एकत्र आणणारी परिषद असून जगातील 15 देशातून आणि भारतातील 20 राज्यातून 300 पेक्षा जास्त प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झालेले आहेत.जगभरातील संशोधक, शास्त्रज्ञ,तज्ञ त्यांचे ज्ञान, अनुभव आणि नवकल्पना एकाच ठिकाणी सामायिक करणे तसेच लिंबूवर्गीय उद्योगाचा कायापालट करण्यासाठी सहभागी प्रतिनिधींमध्ये नवीन संबंध, सहयोग आणि नेटवर्किंग स्थापित करणे हे परिषदेचे उदिष्ट आहे.आशियाई सायट्रस काँग्रेस-2023 ही 3 दिवसीय परिषद 28 ते 30 ऑक्टोबर 2023 या कालावधीत नागपूर, येथे होत असून “कृषी-आर्थिक समृद्धीसाठी अ‍ॅडव्हान्सिंग सिट्रीकल्चर” ही या परिषदेची संकल्पना आहे. एशिया-पॅसिफिक असोसिएशन ऑफ एग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूशन्स, बँकॉक, थायलंड, कोरियन सोसायटी फॉर सिट्रस आणि सबट्रॉपिकल क्लायमेट फ्रूट्स ,जेजू सिटी, दक्षिण कोरिया यांचा सुद्धा या परिषदेत सहभाग आहे.

देशातील कृषी संशोधन संस्थांनी यावर्षी रोगविरहित उच्च दर्जाची अशी 2 कोटी लिंबूवर्गीय रोपे शेतकऱ्यांना द्यावी याकरिता देशातील संशोधन संस्थांनी खाजगी नर्सरींसोबत भागीदारी करून ही मागणी पूर्ण करावी असे गडकरींनी सांगितले.जगातील तिसरी अर्थव्यवस्था मोठी होण्यासाठी आणि 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेची क्षमता पूर्ण करण्यासाठी शेतीत आमुलाग्र बदल होणे गरजेचे असून भारतातील कृषीदर हा 12 टक्क्यांपेक्षा जास्त वाढायला हवा. त्याचप्रमाणे वेळोवेळी शेतकऱ्यांना लिंबूवर्गीय फळांच्या बाबतीत योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी अचूक धोरणे , योग्य मार्गदर्शन ,योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असे गडकरींनी नमुद केले .

विदर्भातील वर्धाच्या सिंदी रेल्वे येथील ड्रायपोर्टचा वापर करून विदेशात संत्रा निर्यात सुरू आहे अशा ड्रायपोर्ट्स मुळे वाहतूक खर्च कमी होत आहे. भविष्यात भारतात विविध ठिकाणी अशी ड्रायपोर्टस उपलब्ध होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.नागपुरात सध्या मदर डेअरी आणि पतंजली उद्योग समुह संत्र्यावर आधारित नवीन उत्पादने बनवत आहेत .यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना संत्रा पिकवण्यासाठी नक्कीच मदत मिळेल. या परिषदेमधून नवीन तंत्रज्ञान नवीन धोरणे नवीन मतप्रवाह समोर येतील आणि लिंबूवर्गीय फळांच्या उत्पादनात आणि विकासात महत्त्वाच्या अशा घडामोडी घडतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

जगातील एकमेव अशी लिंबूवर्गीय फळांच्या बाबतीत चर्चा घडवून आणणारी परिषद नागपूर येथे होत असून ही विदर्भासाठी अभिमानाची बाब आहे असे प्रतिपादन केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था नागपूरचे संचालक डॉ.दिलीप घोष यांनी यावेळी केले.150 पेक्षा जास्त देशात लिंबूवर्गीय फळांची लागवड होत असून भारत हा जगातील लिंबूवर्गीय उत्पादनात तिसऱ्या क्रमांकावर आहे पाश्चिमात्य राष्ट्रांपेक्षा भारतात होणारे उत्पादन हे कमी असून या समस्येसाठीच परिषदेत विचारमंथन होणार आहे.व्यवस्थापन आणि हवामान बदल यांचा लिंबूवर्गीय फळांच्या उत्पादनाशी प्रत्यक्ष संबंध असून त्याचा परिणाम वेळोवेळी दिसून येतो या क्षेत्राचा इतर उद्योगव्यवसायांशी सुद्धा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या संबंध आहे .भारतातील लिंबूवर्गीय उत्पादनाची भारतातच नव्हे तर जगात ओळख निर्माण व्हावी म्हणूनच ही परिषद आयोजित झालेली आहे . जगातील विविध संशोधक, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, विद्यार्थी, उत्पादक, खरेदीदार अशा सर्वांचा समावेश या परिषदेत असल्याचे डॉ. घोष यांनी सांगितले.

लिंबू वर्गीय फळांची अन्नतालिकेत महत्वाची अशी भूमिका असून या फळांचा आरोग्याची अत्यंत जवळचा असा संबंध आहे. भारतात 27 विविध प्रकारच्या निंबूवर्गीय प्रजाती असून यातील काही प्रजातीना भौगोलिक संकेतांक – जीआय मानाकंन प्राप्त झालेले आहेत यांची निगा आणि जतन करण्याचे आपले कर्तव्य असल्याचे भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत येणाऱ्या पीक संरक्षण शाखेचे उपसंचालक डॉ. टी.आर शर्मा यांनी सांगितले.

लिंबूवर्गीय उद्योग आणि आशियातील लिंबूवर्गीय उद्योगाच्या वाढत्या समस्यांचा सामना करण्यासाठी एक आराखडा या परिषदेतून सादर केला जाणार आहे. ही परिषदशास्त्रज्ञ, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ, विद्यार्थी, प्रोसेसर, निर्यातदार, लिंबू क्षेत्राशी निगडित व्यावसायिक यांना एकत्र आणण्याचे काम करणार आहे. तसेच या क्षेत्रातीलनवीनतम घडामोडींवर चर्चा करण्यासाठी आणि माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी उद्योग तज्ञ आणि धोरणकर्ते यांचा परिसंवाद घडवून आणणार आहे.आशियातील लिंबूवर्गीय उद्योगाचा प्रचार करण्यासाठी एशियन सिट्रस काँग्रेस २०२३ संशोधकांना संधी देईल असा विश्वास परिषदेतून व्यक्त करण्यात आला आहे. या परिषदेप्रसंगी एका स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा