कोराडीत साकारलं आमचं गाव

0

कोराडी “हॅप्पी स्ट्रीट” कार्यक्रमात ४००० व्यक्तींचा प्रत्यक्ष सहभाग

मोठ्यांना बालपणीचा आनंद तर लहानांना बिनधास्त निसर्गमय वातावरण लाभलं

मराठमोळ्या संस्कृतीचं दर्शन, लुप्त झालेले खेळ आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थाने उदरतृप्ती

संचालक, कार्यकारी संचालक आणि मुख्य अभियंत्यांची विशेष उपस्थिती

कोराडी २९ ऑकटोबर २०२३ : उन्हाळ्यात शाळेला सुट्ट्या लागल्या कि मामाच्या गावाला जाऊन धमाल मस्ती करायची, गावाकडील निसर्गरम्य मातीशी नातं जोडीत, नात्यांची वीण अधिक घट्ट करायची अशी आपली मराठी संस्कृती. मात्र धकाधकीच्या जीवनात ही जागा टी.व्ही.,मोबाईल, फेसबुक,व्होट्सअप सारख्या आभासी दुनियेने व्यापल्याने जीवनाचा खरा-खुरा आनंदच दूर झाला. मानवी जीवन तांत्रिक झाले, यातून उदयास आलेली शहरी संकल्पना म्हणजे “हॅप्पी स्ट्रीट”. मामाच्या गावाला न जाता सुटीच्या दिवशी सकाळच्या प्रहरी मुख्य रस्त्यावरील रहदारी काही वेळापुरता बंद करून त्याठिकाणी मनसोक्त खेळ, धमाल मस्ती करायची हा यामागचा उद्देश.

महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्राच्या ४९ व्या वर्धापन दिना निमित्ताने कोराडी विद्युत विहार वसाहतीतील मुख्य रस्त्यावर “हॅप्पी स्ट्रीट” आमचं गाव साकारण्यात आले. महानिर्मितीच्या राज्यभरातील अधिकारी-कर्मचारी व कुटुंबीयांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. विशेषतःकोराडी, खापरखेडा,चंद्रपूर,पारस,परळी आणि मुंबई मुख्यालयातील अधिकारी व कोराडी वसाहतीतील कुटुंबीय अश्या सुमारे ४००० व्यक्तींनी या कार्यक्रमाचा भरपूर आनंद घेतला. हिरव्यागार वृक्षांच्या सावलीत, रंगबिरंगी फुगे, झेंडे, तोरणे, कागदी फुलांनी रस्त्याला आकर्षक सजविण्यात आले होते. सोबतीला मिकी-माउस,चार्ली चॅपलीन आणि मोटू-पतलू कार्टून्स उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. वयाचे भान विसरून, आपलं-परकं विसरून, प्रत्येकाने बालपणीच्या खेळाचा निखळ आनंद लुटला. नेहमी चारचाकी चालविणारा बैलबंडी चालवित होता तर माता-भगिनी आपल्या मुलांना विसरून टिक्कर बिल्ला, लगोरी, दोरीवरच्या उड्या, पाळणे इत्यादींचा मनसोक्त आनंद घेत होत्या. साडेतीन तास कसे संपले कोणालाच कळाले नाही. घराकडे परतीची पाउले वळायला तयार नव्हती एवढा जीव “हॅप्पी स्ट्रीट” आमचं गावाने लावला. एरवी घरात बोलायला वेळ नसणारी पालक मंडळी “हॅप्पी स्ट्रीट” वर एकमेकांशी खुलून बोलताना दिसली तर मुले-मुली देखील आपले आई-वडील, टायर, लोखंडी रिंग चालवित धावत असल्याचे पाहून आश्चर्य चकित झाले. अनेकांनी गाणे म्हणून आपले गळे साफ केले. जात,पात,धर्म,वय,पद,गर्व दूर सारून प्रत्येक व्यक्ती स्वत:ला व्यक्त करीत नि:स्वार्थपणे सहभागी झाल्याचे दिसून येत होते. “हॅप्पी स्ट्रीट” च्या माध्यमातून अख्ख आमचं गावच कोराडीत साकारण्यात आले होते.

अखंडित वीज उत्पादनाचे राष्ट्रीय कार्य करणाऱ्या महानिर्मितीच्या अधिकारी-कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी “हॅप्पी स्ट्रीट” हा उत्तम पर्याय असल्याचे मुख्य अभियंता विजय राठोड म्हणाले. या कौटुंबिक कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला त्याचे कारण लहान मुला-मुलींसाठी बक्षिसे, बुढ्ढी का बाल(शुगर कँन्डी),कागदी फुले(ओरेगामी) प्रशिक्षण, जादूचे प्रयोग, रिंग टोस, बंदुकीच्या गोळीने फुगे फोडणे, दोरीचे झुले,बैलगाडी,गाय-वासरू,उंट, टांगा-घोडा, बकरीचे पिल्लू, बॉल गेम्स, सापशिडी, टायर, लोखंडी रिंग चालविणे, दोरीवरच्या उड्या, रांगोळी, चित्रकला तर तरुणी व महिलांसाठी मेहंदी, टॅटू,नेल आर्ट, बॅडमिंटन, फुटबॉल, लगोरी, दरीवरच्या उड्या, कंबर रिंग, प्लेट थ्रो, रबर रिंग, रेखाचित्र, पुरुष वर्गासाठी फुटबॉल,प्लेट थ्रो, बॅडमिंटन,कार्टून्स, कंचे, भवरे इत्यादी उपलब्ध होते. फूड झोनमध्ये इंडियन कॉफी हाउसचे खाद्यपदार्थ, शबाना बेकरीचे प्रोडकट्स, समोसा,
चहा, ढोकळा, मोमो, मोड कडधान्ये, भेळ, चना मसाला, पाणीपुरी, नारळपाणी, उसाचा रस, उकडलेले बोरं अश्या नानाविध खाद्यपदार्थांची रेलचेल होती. ज्येष्ठ नागरिकांसाठी योगासन,बुद्धिबळ, कॅरम, वृत्तपत्र,मासिके वाचन व संगीत तर मुख्य स्टेजवर डी.जे.संगीत, रेडीओ जोकीची धमाल कॉमेंट्री, झुम्बा डान्स थरार तर  दुसऱ्या मंचावर प्रत्येकाला व्यक्त होण्याची संधी ज्यामध्ये गाणे,नृत्य,मिमिक्री, कविता, वाद्य वाजविणे इत्यादी कला अनेकांनी  सादर केल्या. संजय मारुडकर यांनी सर्व उपस्थितांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच चित्रपटातील गाणे सादर केले.

कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कोराडी चमूच्या सहकार्याने “हॅप्पी स्ट्रीट” (आमचं गाव) कार्यक्रम अतिशय यशस्वीरीत्या संपन्न झाला.  कार्यक्रमाला महानिर्मितीचे संचालक(संचलन) संजय मारुडकर, कार्यकारी संचालक पंकज सपाटे, मुख्य अभियंते विलास मोटघरे, अनिल काठोये, विवेक रोकडे, सुनील रामटेके, कोराडी-खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राचे उप मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते,  वर्धापन दिन समितीचे सचिव राजेश गोरले, सहसचिव सचिन डांगोरे, महावितरण चे उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे, सेवानिवृत्त अधिकारी संजय अस्वले , विभागप्रमुख, अधिकारी,अभियंते, तंत्रज्ञ, कर्मचारी व कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वितेत “हॅप्पी स्ट्रीट” आयोजन समितीचे प्रमुख सचिन भगेवार, उपसमिती प्रमुख प्रविन मडावी, समन्वयक प्रवीण बुटे आणि मयूर मेंढेकर आणि सर्व
पदाधिकारी व सदस्यांनी मोलाची भूमिका बजावली तसेच स्थापत्य, विद्युत, अग्निशमन, सुरक्षा तसेच सर्व विभागांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा