व्हीपचा ई-मेल मिळालाच नाही, शिंदे गटाचा युक्तिवाद

0

मुंबई : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवरील सुनावणी (Shivsena MLA Disqualification Case) पुढची सुनावणी ही २१ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या प्रकरणाची कागदपत्रे ही १६ नोव्हेंबरपर्यंत सादर करावी लागणार आहेत. दीड तास झालेल्या आजच्या युक्तिवादावेळी व्हिपच्या मुद्द्यावरून ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तीवाद झाला. आमदारांना जारी करण्यात आलेला व्हिप हा ई मेलच्या माध्यमातून पाठवण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाच्या वकिलांनी केला. तर तो व्हिप आपल्याला मिळालाच नसल्याने व्हिपचे उल्लंघन करण्याचा प्रश्नच येत नसल्याचे शिंदे गटाच्या वकिलांनी सांगितले.
आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापुढे सुनावणी सुरु झाली आहे. या प्रकरणात शिवसेनेच्या आमदारांच्या एकूण ३४ याचिकांचे सहा गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. आज सुरू असलेल्या या सुनावणीला ठाकरे गटाचे अनिल देसाई, सुनिल प्रभू आणि अजय चौधरी सुनावणीला उपस्थित होते. तर शिंदे गटाचे कुणीही उपस्थित नव्हते. दोन्ही गटांमध्ये ई मेलवरच्या व्हिपवरून जोरदार युक्तिवाद झाल्याचं दिसून आलं. ठाकरे गटाच्या वतीने सांगण्यात आले की, शिंदे गटाच्या १६ आमदारांना ई मेलच्या माध्यमातून व्हिप बजावण्यात आला होता. त्या संबंधित त्यांनी पुरावेही सादर केले. पण, ज्या ई-मेल आयडींवर व्हिप पाठवण्यात आले होते ते आपले नसल्याचा दावा शिंदे गटाच्या वकिलांनी केला. आपल्याला व्हिप मिळालाच नाही, त्यामुळे उल्लंघन होत आहे, असाही दावा करण्यात आला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा