
अहमदनगर AHMADNAGAR : नगरमध्ये काल रात्री तब्बल १ कोटी रुपयांची लाच घेताना एका अभियंत्याला रंगेहाथ पकडण्यात आले. कामाची बिले देण्यासाठी या अभियंत्याने कंत्राटदारास १ कोटी रुपयांची लाच मागितली होती. अमित गायकवाड असे या अभियंत्याचे नाव असून तो महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहाय्यक अभियंता होता, अशी माहिती एसीबीच्या सूत्रांनी दिली. नगर-संभाजीनगर बायपासवर हा सापळा रचण्यात आला होता. (ACB Trap in Ahmednagar)
एमआयडीसीअंतर्गत पाईपलाईन टाकण्याच्या कामाची बिले काढण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. यासंदर्भात तक्रार झाल्यावर नाशिक (Nashik) येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या पथकाने तब्बल एक कोटी रुपयांची लाच घेताना गायकवाड याला अटक केली. या प्रकरणांमध्ये तत्कालीन अभियंता गणेश वाघ यांचा देखील 50 टक्के वाटा होता, अशी कबुली अटकेत असलेल्या अमित गायकवाड याने दिल्याची माहिती आहे. याबाबत रात्री उशिरा अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे येथील औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत १०० एमएम व्यासाची पाईपलाईन टाकण्याचे काम केले होते. या कामाचे दोन कोटी ६६ लाख ९९ हजार २४४ रूपयांचे बिल मिळावे, म्हणून सदर बिलांवर तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ यांच्या मागील तारखेच्या सह्या घेवुन सदरचे देयक पाठविले होते. त्या मोबदल्यात गायकवाड याने स्वतःसाठी तसेच वाघ याच्याकरीता या बिलाच्या कामाचे व यापुर्वीच्या काही बिलांसाठी बक्षीस म्हणून ही लाच मागितल्याचे उघडकीस आले. अलिकडच्या काळातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे.