
‘दीर्घायुष्यासाठी आयुर्वेद स्वीकारा’ चा दिला संदेश
रथयात्रा व रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
‘आयुर्वेद दिन’ निमित्त क्षेत्रीय आयुर्वेदिक अनुसंधान संस्थानचे भव्य आयोजन
आयुर्वेद, योगविज्ञान, युनानी ही आपली संस्कृती असून त्याला जगात मान्यता मिळालेली आहे. पंचकर्माला जगात मोठी मागणी आहे. आयुर्वेद केवळ चिकित्सा पद्धती नसून आपले जीवनशैली आहे. त्याला प्रोत्साहन दिल्यास समाज व देशाचे हित साधले जाईल. त्यासाठी अशा कार्यक्रमांच्या आयोजनाचे खूप महत्त्व आहे, असे नितीन गडकरी म्हणाले. क्षेत्रीय आयुर्वेदिक संशोधन संस्थानच्या आयुर्वेदाच्या प्रचार व प्रसारासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कौतुक केले.
आयुष मंत्रालय, भारत सरकारच्या अंतर्गत कार्यरत केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान अनुसंधान परिषद, नवी दिल्ली द्वारे संचालित क्षेत्रीय आयुर्वेदिक अनुसंधान संस्थान, नंदनवन, नागपूरच्या वतीने 8 व्या आयुर्वेद दिनाचे औचित्य साधून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ‘हर दिन हर किसी के लिए आयुर्वेद’ ही यावर्षीच्या आयुर्वेद दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे.
ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण संस्था, क्रीडा चौक येथून द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक विजय मुनिश्वर, आशियाई स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावणारी महाराष्ट्राची पहिली बॉक्सर अल्फिया पठाण, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सायकलपटू अमीत समर्थ, ईश्वर देशमुख कॉलेजचे प्राचार्य एस. नायडू, राधाकृष्णन हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. पोतदार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून रॅलीला शुभेच्छा दिल्या. यावेळी क्षेत्रीय आयुवेदिक अनुसंधान संस्थानचे सहायक संचालक डॉ. मिलिंद सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.
आयुर्वेदाला केवळ देशात नाही तर परदेशातही मोठी मागणी असून आयुर्वेद डॉक्टरांनी केवळ आयुर्वेदाचीच प्रॅक्टीस करावी, त्यांनी अॅलोपॅथीचा आधार घेऊन नये. कारण आयुर्वेदावर लोकांचा विश्वास आहे, तो सार्थ करून आयुर्वेदाचा प्रचार करणे आवश्यक आहे. आयुर्वेद क्षेत्रात व्रतस्थपणे करणारे आयुर्वेद डॉक्टर ही आपली शक्ती ठरणे आवश्यक असून या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संशोधनाची गरज आहे, असे नितीन गडकरी व्हिडीओ संदेशात म्हणाले.
‘रोग अनेक उपाय एक – आयुर्वेद’, ‘दीर्घायुष्यासाठी आयुर्वेद स्वीकारा’ असा संदेश देत रविवारी सकाळी ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या परिसरातून भव्य आयुर्वेद रथयात्रा व रॅली निघाली. विविध आयुर्वेद संस्था व विद्यार्थ्यांचा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
हजारोंचा सहभाग
आयुर्वेदाच्या प्रचार व प्रसारासाठी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये आयुर्वेदाचा इतिहास उलगडणारे व आयुर्वेदाचा संदेश देणारे बैद्यनाथ, दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद, आयुर्वेद व्यासपीठ अशा विविध आयुर्वेदिक संस्थांचे चित्ररथ सहभागी झाले होते. याशिवाय ई-रिक्षा नीमा, दत्ता मेघे इन्स्टिट्यूट, बैद्यनाथ, केडीके आयुर्वेदिक कॉलेज, श्री आयुर्वेद, शासकीय आयुर्वेदिक कॉलेज, आरोग्य भारती, विज्ञान भारती, नीरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर्स असोसिएशन, लायन्स क्लब, आदर्श फार्मसी कॉलेज, बेटीयां शक्ती फाउंडेशन, पुलक मंच, अमर स्वरूप फाऊंडेशनचे विद्यार्थी व सदस्य हजारोच्या संख्येने रॅलीत सहभाग झाले होते.
पारितोषिके व प्रमाणपत्रांचे वितरण
रॅलीत सहभागी झालेल्या प्रत्येक सदस्य व संस्थांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला आ. कृष्णाजी खोपडे, पद्मश्री डॉ. विकास महात्मे, दत्ता मेघे आयुर्वेद कॉलेजचे डॉ. मनीष देशमुख, नीरीचे डॉ. कृष्णमूर्ती व डॉ. मिलिंद सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ज्युपिटर आयुर्वेद कॉलेजला प्रथम, भाऊसाहेब मुळक केडीके कॉलेज बुटीबोरीला द्वितीय तर दत्ता मेघे कॉलेज वानाडोंगरीला तृतीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कृष्णाजी खोपडे यांनी या उपक्रमाचे कौतुक करतानाच कोविड काळात आयुर्वेदाने आरोग्यरक्षणात प्रमुख योगदान दिले असून आयुर्वेदाचा रथ आता प्रगतीपथावर असल्याचे सांगितले. डॉ. विकास महात्मे यांनी आयुर्वेदात असलेली आरोग्यसंवर्धनाची क्षमता पूर्ण शक्तीने वापरण्याची वेळ आल्याचे सांगितले. डॉ. मिलिंद सुर्यवंशी यांनी आयुर्वेदावर पहिल्यांदाच नागपुरात चित्ररथांचे आयोजन करण्यता आले असून देशभरात 11 शहरांमध्ये एकाचवेळी बाईक रायडर रॅली निघत असल्याचे सांगितले. या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे त्यांनी आभार मानले.