
(Mumbai)मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मराठा विरुद्ध ओबीसी असा वैचारिक संघर्ष सुरु असतानाच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal on Maratha Reservation) यांच्या आक्रमक भूमिकेमुळे राज्य सरकारमध्येच मतभेद निर्माण झाल्याचे चित्र तयार होत आहे. दरम्यान, भुजबळ यांच्याकडून टोकाची भूमिका घेतली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार ( DCM Ajit Pawar) यांनी लक्ष घालावे, अशी भूमिका उत्पादन शुल्क मंत्री आणि शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) यांनी मांडली आहे.
काल भुजबळ यांनी मनोज जरांगे आणि मराठा नेत्यांवर टीका केली होती. सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध करत, मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, अन्यथा ओबीसींनी रस्त्यावर उतरुन विरोध करावा, असं आवाहन भुजबळ यांनी केलं होतं. पुढच्या दाराने आरक्षण मिळत नाही, त्यामुळे ओबीसीमधून आरक्षण (OBC Reservation) म्हणजे मागच्या दारातून वाट मिळवण्याचा प्रयत्न आहे. तसेच मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना जे न्यायाधीश जाऊन भेटतात, त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा नसल्याचे भुजबळ म्हणाले होते. त्याला प्रत्युत्तर देताना शंभूराज देसाई म्हणाले की, आमचे सहकारी मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही असे आश्चर्यकारक वक्तव्य केले. ते संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आहे, हे मंत्रिमंडळ बैठकीत स्पष्ट झाले आहे. अचानक भुजबळ यांनी असे वक्तव्य केल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. ओबीसींच्या आरक्षणाला आम्ही कुठलाही धक्का लावणार नाही.

कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यप्रणाली निश्चित झाली आहे. कॅबिनेट बैठकीत देखील त्यावर चर्चा झाली. जर कुणबी प्रमाणपत्र कुणाकडे असेल ते तपासून प्रमाणपत्र द्यावे, असे ठरले आहे. मी काही तरी केले आणि तुमचे थांबवले, असे भुजबळ यांना दाखवायचे आहे का? असा संभ्रम ते करत आहेत की काय? त्यांनी केलेल वक्तव्य अयोग्य आहे, असे देसाईंनी नमूद केले.