
मुंबई-संपूर्ण महाराष्ट्रात कुणबींच्या नोंदी तपासण्याची माेहीम सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्यावर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त करीत टीका केली आहे. सरकारविरुद्धच दंड थोपटणाऱ्या भुजबळांच्या वक्तव्याचे पडसाद आज मंत्रिमंडळ बैठकीत उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मंत्रिमंडळ बैठकीत यावरून नेमक्या काय घडामोडी होतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. (Minister Chhagan Bhujbal)
भुजबळ यांनी आपल्याच सरकारविरोधात दंड थोपटून राज्यात ओबीसींच्या सभा घेण्याचा इशाराही दिला आहे. विविध ओबीसी संघटनांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. मंगळवारी भुजबळ यांच्या मुंबईतील बंगल्यावर या संघटनांची बैठक होऊन रणनीती ठरवण्यात आली. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्याविरोधात कोर्टात जाण्याचा इशाराही देण्यात आला. त्यावरुनमराठा-ओबीसी आरक्षणाच्या या मुद्द्यावर महायुतीत तणाव दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भुजबळ यांना गैरसमज न पसरविण्याचा इशारा दिलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता मंत्रिमंडळ बैठकीत त्याचे काय पडसाद उमटतात, याकडे लक्ष लागलेले आहे.