
पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शरद पवारांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या बाणेर येथील निवासस्थानी पुन्हा एकदा भेट झाली आहे. दिवाळीनिमित्त हे दोन्ही नेते एकत्र आले. यावेळी सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. अजित पवार व शरद पवार यांचे यावेळी एकत्र सहकुटुंब जेवणही झाले. या भेटीनंतर अजित पवार हे तातडीने दिल्लीला रवाना (DCM Ajit Pawar in Delhi) झाल्याची माहिती असून त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगल्या आहेत. (NCP Politics)
प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात तासभर चर्चा झाल्याचे काही सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, या घडामोडी इथेच थांबलेल्या नसून अजित पवार अचानक प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानाहून पुणे विमानतळावर गेले. तिथून ते दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार अमित शाहांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अजित पवारांसह प्रफुल पटेल देखील अमित शाहांना भेटणार असल्याची चर्चा आहे. शुक्रवारी सकाळी राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही शरद पवारांची भेट घेतली होती.