
पुणे : राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर वळसेंनी प्रथमच पवारांची भेट घेतली. रयत शिक्षण संस्थेसंदर्भात ही भेट घेतली व दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले. संस्थात्मक राजकारणात शरद पवारांचा शब्दच अंतिम शब्द असतो, असे उत्तरही त्यांनी एका प्रश्नावर दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवारांना पाठिंबा दिला. सध्या विद्यमान सरकारमध्ये ते सहकार मंत्री आहेत. शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून त्यांनी राजकारणात ओळख आहे. राष्ट्रवादीतील फुट पडल्यानंतर ही पहिलीच दिवाळी आहे. त्यामुळं वळसे पाटील हे दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी गेल्याचे सांगण्यात येत होते. यासंदर्भात बोलताना वळसे पाटील म्हणाले की, शरद पवार साहेबांची (Sharad Pawar) भेट घेतल्यामुळे कोणताही संभ्रम होण्याचे कारण नाही. कारण शरद पवारसाहेब हे विविध संस्थांचे अध्यक्ष आहेत. त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी वेळोवेळी भेट घेत असतो, असे त्यांनी सांगितले. आज रयत शिक्षण संस्थेसंदर्भात शरद पवार यांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले.