मुंब्र्यात शिवसेनेच्या दोन्ही गटांत तणाव

0

ठाणे: शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये मुंब्र्यांच्या शाखेवरुन सुरु असलेल्या वादाला तणावाचे स्वरुप आले आहे. शिंदे गटाने मुंब्रा येथील शिवसेनेची मध्यवर्ती शाखा ताब्यात घेतली व त्यानंतर ती जमिनदोस्त केल्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाकरे आज मुंब्र्याच्या भेटीवर असून ते शाखेत दाखल झाले असल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेनेचे दोन्ही गट एकमेकांविरुद्ध सरसावले असून जोरदार घोषणाबाजी सुरु आहे.
शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी स्थापन केलेल्या मुंब्रा येथील शिवसेना मध्यवर्ती शाखेवरून शिंदे आणि ठाकरे गटात वाद झाला आहे. या वादातून शिंदे गटाचे पदाधिकारी राजन किणे यांनी जेसीबीच्या साहाय्याने शाखा जमीनदोस्त केली होती. तसेच, शिंदे गटाने याठिकाणी नव्याने शाखा बनविण्यासाठी मंगळवारी भूमिपूजन केले होते. याच जमीनदोस्त केलेल्या शाखेच्या ठिकाणी मुंब्रा येथे उद्धव ठाकरे आल्याने वाद निर्माण झाला. संघर्षाची शक्यता लक्षात घेऊन शहरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असूनपोलिसांनी ठाकरे गटाचा ताफा अडवल्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड संतापल्याचे दिसून आले.
आधीची शाखा जमीनदोस्त केल्यानंतर शिंदे गटाने त्याच ठिकाणी कंटेनर शाखा उभी केली. ही शाखा तात्पुरती असल्याचे सांगण्यात आले. मुंब्र्यातील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेतील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना बाहेर काढत शिंदे गटाने ही शाखा जेसीबीने जमीनदोस्त केल्याने गोंधळ उडाला होता.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा