
मुंबई- मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावरुन शिवसेना शिंदे गटातील दोन नेत्यांमध्ये सुरु असलेला वाद विकोपाला गेला आहे. शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकर आणि रामदास कदम या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकी सुरु असून कदम यांचा गद्दारीचा इतिहास मोठा असल्याची टीका कीर्तीकरांनी केल्याने हा वाद विकोपाला गेलाय. (Ramdas Kadam Vs Gajanan Kirtikar in Mumbai)
सध्या उत्तर पश्चिम मुंबईचे प्रतिनिधित्व गजानन किर्तीकर हे करीत आहेत. किर्तीकर त्यांच्या आजारपणामुळे निवडणुक लढणार नसल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. ज्यानंतर रामदास कदम यांनी त्यांचे चिरंजीव सिद्धेश कदम यांना उमेदवारी देण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. यावरुनच गजानन किर्तीकर यांनी रामदास कदमांवर जोरदार टीका केलीय. कदम यांनी किर्तीकर यांच्या मतदार संघावर दावा सांगितल्यानंतर गजानन किर्तीकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे रामदास कदम यांच्यावर खरमरीत टिका केलीय. याआधीही रामदास कदम यांनी माझ्याविरोधात मालाड विधानसभा निवडणुकीत गद्दारी करत मला पाडण्याचा प्रयत्न केला होता व कदम यांच्या गद्दारीचा इतिहास मोठा आहे, अशी खोचक टीकाही त्यांनी पत्रातून केली आहे.