बीडमध्ये एकाच रुग्णवाहिकेत २२ मृतदेह!

Share This News


बीड : बीडमध्ये महाभयंकर आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एकाच रुग्णवाहिकेतून एक दोन नव्हे तर २२ मृतदेह कोंबून त्यांची वाहतूक केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. त्यामुळे केवळ बीडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेवर रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात तीव्र संतापही व्यक्त होत आहे.
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात कोरोनामुळे मृत झालेल्या तब्बल २२ रुग्णांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीकडे नेण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे मरण पावल्यानंतरही कोरोनाबाधितांची अवहेलना होत असल्याने रुग्णालय प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे. रविवारी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यावर कहर म्हणजे रुग्णवाहिकाच नसल्याने मृतदेहांना एकावर एक टाकून स्मशानभूमीत न्यावे लागत असल्याचे रुग्णालयाचं म्हणणे आहे.
या रुग्णालयात केवळ दोनच रुग्णवाहिका आहेत. कोरोनाचे वाढते संकट पाहता पाच अतिरिक्त रुग्णवाहिकांची मागणी करण्यात आली आहे. १७ मार्च २०२१ रोजी जिल्हा प्रशासनाला पत्र लिहून अतिरिक्त रुग्णवाहिका देण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र अजून कोणताही रुग्णवाहिका मिळालेली नाही, असे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे. रुग्णावाहिका नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून स्थानिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.