शिवनेरी किल्ल्याच्या संवर्धनासाठी 23 कोटींचा निधी, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती

Share This News

छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याचे संवर्धन, सुशोभीकरण आणि पर्यटनदृष्टय़ा विकास करण्यासाठी 23 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित गडकिल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि त्यांचा पर्यटनदृष्टय़ा विकास करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी गडकिल्ल्याचे जतन, संवर्धन, सुशोभीकरण आणि या परिसराचा पर्यटनदृष्टय़ा विकास करण्यात येणार आहे. यासाठी 23 कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. या निधीतून शिवनेरी किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व जपत त्याचा पर्यटनदृष्टय़ा विकास केला जाईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले. या निधीतून पुरातत्व विभाग, वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विविध कामे होतील.

कोणती कामे होणार

यामध्ये प्रामुख्याने अंबरखाना, राजवाडा आणि त्याला जोडून असलेल्या भागाचे पुनुरुज्जीवन, पाथवेंची सुधारणा, रॉककट गुंफांचे पुनरुज्जीवन, पर्यटकांसाठी सोयीसुविधा, दिशादर्शक आणि मार्गदर्शक चिन्हे, बागकाम, शिवनेरी प्रदक्षिणा मार्गाची सुधारणा, वरसुबाई मंदिर ते पद्मावती मंदिराकडे जाणाऱया रस्त्याची सुधारणा, शिरोली ते तेजेवाडी रस्त्याची सुधारणा, शिवसंपुल येथे इको टुरिझमची कामे, अप्पर पाथवेसाठी गॅबियन वॉल, बागेसाठी लॅण्डस्केपिंगची कामे होतील.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.