हिवाळी अधिवेशन:नगर-बीड-परळी रेल्वेमार्गासाठी 250 कोटी, रस्त्यांसाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद

Share This News

कोरोनाच्या संकटातून मार्ग काढत राज्याचा गाडा पुढे हाकण्यासाठी राज्य सरकारने २१ हजार ९९२ कोटींच्या पुरवणी मागण्या सोमवारी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पटलावर ठेवल्या. पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून राज्यातील रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी २ हजार कोटींची तरतूद करतानाच नैसर्गिक आपत्तीच्या नुकसान भरपाईसाठी २२११ कोटी, तर धान खरेदीसाठी प्रोत्साहन म्हणून २८५० कोटींची तरतूद केली आहे. नगर-बीड-परळी, वर्धा-यवतमाळ-नांदेड व नागपूर-नागभीड या रेल्वेमार्गांसाठी २५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रेल्वे सुरक्षा बांधकामांसाठी १५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

मागील अधिवेशनात २९ हजार कोटींची तरतूद केल्यानंतर या अधिवेशनात २२ हजार ९९२ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या आहेत. आजच्या पुरवणी मागण्यांत जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधीतील अतिवृष्टी व पूरबाधितांसाठी २२११ कोटींची तरतूद करण्यात आली. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत धान खरेदी व प्रोत्साहनपर राशी २८५० कोटींची तरतूद करतानाच प्रधानमंत्री पीक विमा योजनेत राज्याचा हिस्सा म्हणून १००० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान कृषी सिंचन योजना/ बळीराजा जलसंजीवनी योजनेसाठी ४०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आपत्तीच्या काळात महत्त्वाच्या ठरणाऱ्या डिझास्टर मॅनेजमेंटसाठीही १२ कोटी ८४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

रस्ते व पुलांसाठी भरीव तरतूद करण्यात आली असून रस्ते व पुलांच्या परीरक्षण व दुरस्तीकरिता १००० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. हायब्रीड अ‍ॅन्युइटीअंतर्गत रस्ते व पुलांच्या बांधकामांसाठी १००० कोटी तर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत आशियाई बँकेकडून होणाऱ्या कर्जसाहाय्यातून कामांसाठी ३०६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या बँकेच्या माध्यमातून होणाऱ्या रस्ते व पुलांच्या कामांसाठी ३०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. राज्य मार्ग बिगर अनुशेष या योजनेंतर्गत २५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. समृद्धी महामार्ग निर्मितीसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजासाठी ४०५ कोटींची तरतूद केली आहे.

आपत्कालीन सेवेतील रुग्णवाहिकांसाठी १३१ कोटी रुपयांचा निधी
आरोग्यासाठी भरीव तरतूद करतानाच जे. जे. रुग्णालयाच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालय इमारतीसाठी २५ कोटींची तरतूद करण्यात आली. आपत्कालीन सेवेतील रुग्णवाहिकांच्या खर्चासाठी १३१ कोटींचा निधी तर रुग्णालयांच्या कार्यालयीन खर्चासाठी २० कोटींच्या अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आली आहे.

पोषण आहारासाठी सुमारे ८०० कोटी
केंद्र पुरस्कृत एकात्मिक बालविकास याेजनेंतर्गत पोषण आहारासाठी सुमारे ८०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनासाठी ३१३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

खातेनिहाय विभागांसाठी अशी आहे तरतूद
– कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘एसटी’साठी १००० कोटींचा निधी
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकासाठी १०० कोटींची तरतूद
– निवृत्तिवेतनासाठी ७५० कोटी
– महापालिका व नगर परिषदांना विकासकामांसाठी ८७७ कोटी
– जकात कर रद्द केल्याने नगर परिषदांना साहाय्य अनुदान ५३३ कोटी
– अनुसूचित जाती व बौद्ध समाजाच्या घरकुल योजनांसाठी ५०० कोटी
– मराठा आरक्षण, पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत नेमलेल्या ज्येष्ठ वकिलांच्या मानधनासाठी ३ कोटी.
– महिला व बालकांवरील सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याकरिता प्रशिक्षण व प्रयोगशाळा तयार करण्यासाठी ४ कोटी ५८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
– ज्या कोरोना योद्ध्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबीयांना साहाय्य देण्यासाठी ५ कोटींचा अतिरिक्त निधी
– माजी मंत्री आर. आर. पाटील यांच्या सांगली जिल्ह्यातील स्मारकाच्या बांधकामासाठी ६ कोटी ८४ लाखांची तरतूद
– गरिबांना शिवभोजन थाळीसाठी ३९ कोटी ७२ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

वरळी पोलिस वसाहतीच्या दुरुस्तीसाठी १० कोटी
वरळी पोलिस वसाहतींच्या दुरुस्तीबाबत राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार पुरवणी मागण्यांत तरतूद करण्यात आली आहे. या वसाहतींच्या बाहेरील व अंतर्गत दुरुस्तीसाठी १० कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे हा प्रश्न आता मार्गी लागणार आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.