जिल्ह्य़ातील ३३ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना लस मिळणार
पूर्व विदर्भात ७० हजार ५३२ कर्मचाऱ्यांची नोंदणी पूर्ण
नागपूर : करोना प्रतिबंधक लस डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात अथवा जानेवारीत येण्याचे संकेत आहेत. ही लस पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. त्यात पूर्व विदर्भातील ८८ हजार २ कर्मचारी राहणार आहेत. एकूण कर्मचाऱ्यांत सर्वाधिक ३३ टक्के आरोग्य कर्मचारी नागपूर जिल्ह्य़ातील आहेत, हे विशेष.
केंद्र सरकारच्या सूचनेवरून राज्य शासनाने आरोग्य खात्याच्या मदतीने शासकीय व खासगी रुग्णालयांत सेवा देणाऱ्या डॉक्टर, परिचारिकांसह सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांची नाव नोंदणी सुरू केली आहे. पूर्व विदर्भात ८८ हजार २ कर्मचारी असून त्यातील ७० हजार ५३२ कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे. दरम्यान, आरोग्य कर्मचाऱ्यांना कोणती लस दिली जाईल याबाबत अद्याप अधिकारी बोलायला तयार नाहीत. परंतु ऑक्सफर्ड विद्यापीठात विकसित आणि स्वदेशी भारत बायोटेकचीही लस देण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, नागपुरात या दोन्ही लसींची वैद्यकीय चाचणी झाली आहे. प्राथमिक चाचणीत लस दिल्यावर कुणावरही गंभीर परिणाम झाले नाही. त्यामुळे आरोग्य क्षेत्रात उत्साह वाढला आहे.
दरम्यान, सार्वजनिक आरोग्य विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यलय व रुग्णालय, नागपूर महापालिका, जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागातील ४९ हजार ५७८ शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांची लसीकरणासाठी नोंदणी झाली आहे. तर खासगी रुग्ण सेवेतील ३८ हजार ४२४ आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे.
सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे – आयुक्त
करोनाच्या लसीकरण प्रक्रिया कधीही सुरू होऊ शकते, त्यासाठी शहरातील संपूर्ण यंत्रणेने सज्ज राहावे, असे आवाहन आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले. महापालिकेत नागरी टास्क फोर्स समितीची बैठक झाली त्यात ते बोलत होते. पहिल्या टप्प्यातील आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात फ्रंट लाईन वॉरिअर्स यांचा डाटा बेस तातडीने तयार करावा. झोननिहाय खासगी रुग्णालयांकडून माहिती मागवावी. लसीकरण केंद्राची माहिती, त्याची चाचपणी, आवश्यक सोयी, कोल्ड चेनबाबतचा अहवाल आठवडाभरात देण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी डॉ. साजीद खान यांनी तयारीबाबत माहिती सादरीकरणाद्वारे दिली. यासाठी शहरातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण १९ डिसेंबरला प्रस्तावित असून दुसऱ्या टप्प्यात लसीकरण मोहिमेत सहभागी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
नागपूर विभागातील आरोग्य कर्मचारी
जिल्हा शासकीय खासगी
नागपूर १०,७९९ १८,३८१
वर्धा ५,३३३ १०,०००
भंडारा ६,१४७ ३,४५७
चंद्रपूर १०,९२७ ४,२१६
गडचिरोली ९,००४ ८८५
गोंदिया ७,३६८ १,४८५