मुंबईत दिवसभरात ६३२ रुग्ण
मुंबई पालिकेच्या निरनिराळ्या उपाययोजनांमुळे करोनाबाधितांची संख्या नियंत्रणात येऊ लागली आहे. शनिवारी दिवसभरात ६३२ करोनाबाधित आढळले, तर १० रुग्णांचा मृत्यू झाला.
बाधित रुग्णांचा शोध घेऊन त्यांना विलगीकरणात ठेवण्याचा सपाटा पालिकेने लावल्यामुळे करोना संसर्गाच्या प्रादुर्भावावर हळूहळू नियंत्रण मिळत आहे. मार्चपासून आतापर्यंत दोन लाख ८६ हजार २६४ जणांना करोनाची बाधा झाली आहे. विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले २५६ रुग्ण शनिवारी करोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. आतापर्यंत दोन लाख ६६ हजार ७१२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले सात पुरुष आणि तीन महिलांचा शनिवारी करोनामुळे मृत्यू झाला. यापैकी आठ जणांना दीर्घकालीन आजार होते. आतापर्यंत १० हजार ९८० रुग्णांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. विविध रुग्णालयांमध्ये सात हजार ७२५ करोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.
मुंबईतील रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण ९३ टक्क्यांवर, तर करोना वाढीचा दर ०.२१ टक्क्यांवर स्थिर राहिला आहे. करोनाबाधितांचा शोध घेण्यासाठी पालिकेने आतापर्यंत २१ लाख ७८ हजार ८४२ चाचण्या केल्या आहेत.
ठाणे जिल्ह्य़ात ४२३ नवे रुग्ण
ठाणे जिल्ह्य़ात शनिवारी ४२३ करोनाबाधित आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २ लाख ३८ हजार ५२८ वर पोहोचली. दिवसभरात आठ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून, करोनाबळींची संख्या ५ हजार ८७१ इतकी झाली आहे.
राज्यात २४ तासांत ३,९४० रुग्ण
राज्यात गेल्या २४ तासोत ३,९४० करोनाबाधित आढळले, तर ७४ जणांचा मृत्यू झाला. एकूण करोनाबाधितांची संख्या १८ लाख ९२ हजार झाली असून, ४८,६४८ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ६१,०९५ रुग्ण उपचाराधीन आहेत. दिवसभरात नाशिक शहर १६०, नगर १८८, पुणे शहर ३४२, पिंपरी-चिंचवड १५३, पुणे जिल्हा १७२, नागपूर शहर ३४४ नवे रुग्ण आढळले.