गृहमंत्र्यांच्या ‘विशेष तक्रार निवारण शिबिरात’ 75 तक्रारी.!
नागपूर, दि. 11 : शहरातील गुन्हेगारीचा आलेख कमी करण्यासाठी पोलीस विभाग उत्तम कामगिरी करीत आहे. नागरिकही सजगता बाळगून पोलिसांना सहकार्य करीत आहेत. या शिबिराच्या माध्यमातून पोलीस आणि नागरिक यांच्यातील संबंध अधिक वृद्धिंगत होत आहेत, असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे केले. यावेळी 75 तक्रारदारांनी आपली गाऱ्हाणी मांडली. पोलीस जिमखाना येथे ‘विशेष तक्रार निवारण शिबिर’ आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. भूमाफियांना निर्बंध घालणारा ‘विशेष तक्रार निवारण शिबिर’ हा पथदर्शी प्रकल्प आहे. या शिबिराच्या माध्यमातून भूखंडाच्या बाबतीत फसवणूक तसेच वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी योग्य ती कारवाई करुन नागरिकांच्या तक्रारींचा त्वरित निपटारा करण्यात येत असून आज 75 प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली. गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणांवर संबंधित विभागांना यावेळी सूचना देण्यात आल्यात.या शिबिरात गुंडगिरी, भूमाफिया, अवैध व्यवसाय, आर्थिक फसवणूक, अतिक्रमण करणे, अवैधरित्या मालमत्तेवर ताबा मिळविणे अशा स्वरुपाच्या 75 तक्रारी आल्या. नागरिकांनी आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी त्यासंबंधित संस्थेची खातरजमा करावी. कोणाच्याही आमिषांना किंवा भूलथापांना बळी पडू नये. नागरिकांना भयमुक्त जगता यावे, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही श्री. देशमुख यावेळी म्हणाले.