गेल्या काही दिवसांपासून मुंबईत एनसीबीकडून धडक कारवाई केली जात आहे. त्यातच आज पुन्हा एकदा एनसीबीने मुंबईच्या विमानतळावर कारवाई केली असून मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन ३ किलोपेक्षा अधिक हेरॉईन जप्त करण्यात आले आहेत. या हेरॉईनची किंमत तब्बल ९ कोटी इतकी असून या हेरॉईनसह एका आफ्रिकन महिलेला अटक करण्यात आली आहे.
अशी करण्यात आली कारवाई
एनसीबीच्या पथकाला माहिती मिळाली होती की, मोठ्या प्रमाणात हेरॉईन भारतात आणले जाणार आहेत. तसेच हे हेरॉईन परदेशी महिला घेऊन येणार असून ती आफ्रिकन महिला असणार असल्याची माहिती देखील मिळाली होती. मात्र, हे हेरॉईन किती कोटींचे आणि किती वजनाचे असणार याबाबत कोणतीही माहिती मिळाली नव्हती. त्यानुसार एनसीबीच्या पथकाने मुंबईच्या विमानतळावर सापळा रचला होता. त्यानंतर एका आफ्रिकन महिलेला ताब्यात घेऊन तिच्याकडून तब्बल ९ कोटी रुपयांची ३ किलोची हेरॉईन जप्त करण्यात आली आहे. ही हेरॉईन कुठे घेऊन जाणार होते. याबाबत कोणतीही अद्याप माहिती मिळाली नसून याप्रकरणी एनसीबी शोध घेत आहेत.