ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्प ठरेल आदर्श
नागपूर नागपूरची मेट्रो ही स्टँडर्ड गेज मेट्रो आहे. भारतीय रेल्वेच्या ब्रॉडगेज मार्गावर मेट्रो कोचेस चालवून नागपूरनजीक सॅटेलाइट सिटीज नागपूरला जोडणे हा प्रस्तावित ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. या ब्रॉडगेज प्रकल्पामध्ये असणार्या रेल्वे कोचेसची मालकी खासगी गुंतवणूकदारांना दिल्यास ही स्थिती गुंतवणूकदार, प्रवासी, भारतीय रेल्वे महामेट्रो तसेच एमएसएम.ईला पूरक आणि फायदेशीर असेल. हा राज्यातील एकमेव असा पहिलाच प्रकल्प असून, आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल आणि याचे अनुकरण संपूर्ण देशात होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग आणि केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी केले. महामेट्रो, केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयअंतर्गत विकास संस्था नागपूरच्या संयुक्त विद्यमाने ब्रॉडगेज रेल्वे मेट्रोसाठी गुंतवणूकदार मेळाव्याचे आयोजन रविवारी स्थानिक साऊथ एअरपोर्ट मेट्रो स्थानकातील सभागृहात करण्यात आले होते. यावेळी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, एमएसएमई विकास संस्थेचे संचालक पी.एम. पार्लेवार उपस्थित होते. प्रस्तावित ब्रॉडगेज मेट्रो स्टेशनमुळे नागपूरनजीक काटोल, भंडारा, वर्धा, अमरावती, नरखेड, रामटेक, वर्धा यासारखे सॅटेलाइट टाऊन्स नागपूरला जोडले जातील. भारतीय रेल्वेच्या ब्रॉडगेज रेल्वे लाईनवर असणारी प्लॅटफॉर्म, सिग्नल व्यवस्था आधीपासूनच तयार असून यावर लागणारा मेट्रोचा रोलिंग स्टॉक सदर प्रकल्पात लागणार आहे. अशा कोचेसची किंमत ही साधारणत: ३0 कोटी असणार असून, त्या मेट्रोच्या खरेदीसाठी केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयाद्वारे गुंतवणूकदारांना इंटरेस्ट सबवेन्शन व इतर अर्थसाहाय्याचीसुद्धा उपलब्धता होणार आहे. स्टँडर्ड गेजची मेट्रो, ब्रॉडगेजची मेट्रो आणि नागपूरचे बस फॅसिलिटीचे एकत्रीकरण करून नागपूर शहरातील कामठी, खापरी, बुटीबोरी, इतवारी, कळमना या रेल्वे स्टेशनला या ब्रॉडगेज मेट्रोमध्ये मुंबईच्या लोकल प्रमाणे एकत्रीकरण करून रेल्वेची इंटर- कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी याचा उपयोग होईल. या कोचेसची मालकी ही प्रामुख्याने प्राधान्याने विदर्भातील उद्योजकांना देण्यात येईल, जेणेकरून स्थानिकांना रोजगार मिळेल, असेही गडकरी यांनी यावेळी नमूद केले. या मेळाव्यात विविध बस संचालक उद्योजक आणि हितधारकांनी त्यांच्या योजनांचे सादरीकरण केले. |