भारताबाहेरील खरा भारतीय…- डॉ.शरच्चंद्र गोखले |A real Indian outside India …- Dr. Sharachandra Gokhale

Share This News

माझ्या कामानिमित्ता च्या प्रवासात देशो-देशी मला अनेक माणसे भेटली.
असाच एक लोकविलक्षण माणूस मला बर्लिन मध्ये भेटला. मी जर्मन सरकारच्या निमंत्रणावरून
गेलो होतो. आमचे जर्मन स्नेही मॅक्स आणि त्यांच्या पत्नी मथिलडे ग्रुनर यांनी मला फार आग्रह
केला की, 
” तू आमच्या तत्त्वज्ञ असलेल्या वृद्ध मित्राला भेटायला जावे.”
त्या मुळे मी बर्लिनला गेल्यावर
काउंट लिंडबर्ग यांना भेटायला गेलो. हे पूर्वाश्रमीचे एक रशियन उमराव आहेत एवढेच मला माहित
होते. बर्लिन शहरापासून १०-१२ मैलांवर एका रानात त्यांनी घर बांधले होते. दारात तुळशी वृंदावन
होते आणि घराला विजेच्या घंटी ऐवजी देवळाबाहेर टांगतात तशी घंटी बांधलेली होती. ती
वाजवून मी आत शिरलो तेव्हा त्यांच्या सहाय्यकाने स्वागत करून मला त्यांच्या खोलीत नेले.
लिंडबर्ग यांचे वय आता
 ८२ वर्षांचे आहे. ते उत्तम सर्जन आहेत. अलीकडे मात्र पायाने चालणे अशक्य झाल्याने ते
व्हीलचेअर वर बसून शस्त्रक्रियेचे मार्गदर्शन करतात. त्यांच्या उशाशी मॉस्को च्या क्रेमलिन
राजवाड्याचे तैलचित्र होते.
मी सहज विचारले,
” कोणी काढले ?”
ते म्हणाले ” मी ! “
मी पुढे विचारले,
” तुम्हाला क्रेमलीनचे आकर्षण कसे ?”
तेव्हा ते म्हणाले,
” या राजवाड्यात माझा जन्म झाला.
रशियन क्रांतीमध्ये ज्या झारला
पदच्युत करण्यात आले, त्या झारच्या बहिणीचा मी मुलगा.
क्रांतीच्या वेळी ज्या स्त्रीला आणि तिच्या मुलाला घोड्याच्या बग्गीच्या मागे लपवून बाहेर
काढण्यात आले त्या व्यक्ती म्हणजे मी आणि माझी आई !
जर्मनीत आल्यावर पुन्हा आमचा पाठलाग सुरू झाला म्हणून आईने लिंडबर्ग नावाच्या जर्मन
माणसाशी लग्न केलं. 
मीही तेच नाव लावतो.”
मी पाठीमागे पाहिले तो गीतोपदेश करणाऱ्या 
भगवान श्रीकृष्णाचे तैलचित्र ! 

तेही त्यांनीच काढलेले.
मी विचारले,
” तुम्ही भगवद्गीतेच्या प्रेमात कसे काय पडलात ?”
ते म्हणाले,
” माणसाला रोग का होतो ? तो बरा कसा करता येतो हे सांगणारे शास्त्र म्हणजे वैद्यकशास्त्र. मी
एक यशस्वी डॉक्टर आहे, पण एका प्रश्नाचे उत्तर मला वैद्यक शास्त्रात सापडत नव्हते.
समान पद्धतीचे जीवन जगणाऱ्या दोन माणसांपैकी एकाला रोग होतो आणि दुसऱ्याला होत नाही.
त्याचप्रमाणे समलक्षणे असणारा एक रोगी औषधोपचाराने बरा होतो.दुसरा होत नाही.याचे कारण
काय असावे असा तो प्रश्न आहे. याचे उत्तर मला 
पाश्चात्त्य वैद्यकशास्त्रात सापडले नाही. संपूर्ण उत्तर आयुर्वेदातही मिळाले नाही. माझ्या
समजण्याला मर्यादा असतील म्हणून मी तत्त्वज्ञानाकडे वळलो.
त्यातून मला भगवद्गीतेची
ओळख झाली.
मी डॉ. राधाकृष्णन व गुरुदेव रानडे यांच्याबरोबर या विषयावर खूप
 पत्र-व्यवहार केला.” 
असे म्हणून त्यांनी त्या पत्रव्यवहाराची फाईलच माझ्या समोर ठेवली. लोकमान्यांच्या
‘ गीता रहस्याचे ‘ बर्लिन विद्यापीठात झालेले जर्मन भाषांतर त्यांनी मला दाखवले.
ते सांगू लागले,
” या प्रश्नाचे उत्तर भारतीय तत्त्वज्ञानात मिळेल या आशेने मी अभ्यास सुरू केला.
दुसरा प्रश्न मला असा पडला होता की, 
“हा रोगी बरा होईल की नाही हे मला माहित नसेल तर हा उपचार तरी मी का करावा ?”
याचे उत्तर मला गीतेच्या कर्मयोगात- फलाकांक्षाविरहीत कर्म म्हणजे फळाची अपेक्षा न करता
कर्म करण्याच्या विचारांत सापडले ! म्हणून मी लोकमान्य टिळकांचा विद्यार्थी आणि
भगवद्गीतेचा किंवा पर्यायाने अध्यात्माचा अभ्यासक झालो आहे.”
मी म्हणालो,
” मी ‘ केसरी’ चा संपादक म्हणून लोकमान्यांच्या गादीवर बसलो असलो तरी माझा अभ्यासाचा
विषय हा समाजशास्त्र, अर्थशास्त्र  व राजनीती असा आहे.त्यामुळे अध्यात्म शास्त्राची गोडी असली
तरी मला त्यात काही समजत नाही.”
त्यावर काउंट लिंडबर्ग म्हणाले,
“तुला महाभारतातल्या राजसूय यज्ञाची गोष्ट सांगतो. यज्ञानंतर एक मुंगूस तेथे आले आणि यज्ञ
वेदीत एका बाजूने लोळले त्यामुळे त्याचे अर्धे अंग सोन्याचे झाले. टिळकांच्या गादीवर
बसल्यामुळे तुझे अर्धे अंतःकरण तरी अध्यात्माचे झाले असेल अशी माझी खात्री आहे ! 

आणि म्हणूनच मी तुला हे अध्यात्म सांगतो आहे.”
लिंडबर्ग यांची एकच इच्छा होती की त्यांच्या मरणानंतर त्यांची सर्व ग्रंथ संपदा भारत सरकारने
सांभाळावी.
ते म्हणाले,
” पुन्हा जन्म मिळावा तो भारतातच !”
मला भारतीय दूतावासात जायचे होते कारण 
भारत-जर्मनी महोत्सवाच्या निमित्ताने त्यांना ‘केसरी’ कडे असलेल्या, ख्यातनाम तत्त्वज्ञ
मॅक्सम्युल्लर यांनी लोकमान्यांना लिहिलेली पत्रे पाहिजे होती. मॅक्सम्युल्लर यांनी लोकमान्य
टिळकांना लिहिलेले एक पत्र देवनागरी लिपीत आहे. त्यावेळी ते ऑक्सफर्ड येथे तत्त्वज्ञान शिकवत
होते. पत्राच्या उजव्या कोपऱ्यात ‘ गोतीर्थ नगरे ‘असा पत्ता घातलेला आहे आणि खाली सही 
‘ मोक्षमुल्लर भट ‘ अशी केलेली आहे !
या पत्राची प्रतिलिपी मी त्यांच्याकडे सुपूर्द केल्यावर बर्लिन विद्यापीठातील ते प्राध्यापक आणि
जर्मन सरकारचे ते प्रतिनिधी इतके आनंदून गेले की विचारायची सोय नाही.
जर्मन सरकारने या पत्राची 
१० x १० फूट एवढी विस्तारलेली
छायाचित्रे करून उत्सवाच्या काळात सर्वत्र लावली होती.
या सर्वांच्या पाठीमागे काउंट लिंडबर्ग यांच्यासारखी भारतात जन्म न घेता पूर्वसुकृतामुळे भारताची
ओढ असलेली मंडळी होती हे निःसंशय !

 • साभार-सादर – विलास पोतदार
  ( ” माझ्या सार्वजनिक जीवनाची बखर ” या डॉ. शरच्चंद्र गोखले लिखित व श्रीविद्या प्रकाशन,
  पुणे येथे
  १९९९ मध्ये प्रकाशित पुस्तकातून वेचलेला एक
  अनुभव )
 • स्व.डॉ. शरच्चंद्र  गोखले हे एक विचारवंत, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे समाजशास्त्रज्ञ आणि ज्येष्ठ
  पत्रकार, ‘केसरी’ चे संपादक म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत.

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.