ऑस्ट्रेलियात धडाकेबाज कामगिरी, मात्र इंग्लंडविरुद्ध संधीच नाही, महाराष्ट्राच्या खेळाडूला डच्चू
मुंबई जलदगती गोलंदाज उमेश यादवचे संघात पुनरागमन झाले आहे. उमेश ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत दुखापतग्रस्त झाला होता. दरम्यान तो आता या दुखापतीतून पूर्णपणे सावरला आहे. फिटनेस टेस्टनंतर उमेश मैदानात उतरेल. उमेशला संधी देताना निवड समितीने जलदगती गोलंदाज शार्दुल ठाकूरला संघातून वगळलं आहे. शार्दुलच्या जागी उमेश असा एकमेव बदल भारतीय संघात करण्यात आला आहे. दुखापतग्रस्त खेळाडूंपैकी मोहम्मद शमी, हनुमा विहारी, रवींद्र जडेजा, नवदीप सैनी यांच्यापैकी कोणताही खेळाडू अद्याप संघात पुनरागमन करु शकलेला नाही. दरम्यान, एकही संधी न देता शार्दुलला संघातून वगळणं अनेकांना पटलेलं नाही.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवला होता. शार्दुल ठाकूर या सामन्याचा हिरो ठरला होता. भारताची फलंदाजी ढेपाळल्यानंतर शार्दुल ठाकूरने आक्रमक अर्धशतक ठोकून भारताचा डाव सावला होता. तर या सामन्यात पहिल्या डावात गोलंदाजी करताना शार्दुलने तीन विकेट्स मिळवल्या होत्या. तर दुसऱ्या डावात त्याने चार कांगारुंना बाद करत भारताचं या सामन्यातील आव्हान जिवंत ठेवलं होतं. मिळालेल्या संधीचं सोनं करुनही शार्दुलला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी संघात स्थान देण्यात आलेलं नाही. दुसऱ्या बाजूला शार्दुलला आगामी विजय हजारे ट्रॉफीसाठी (Vijay Hazare Trophy 2o21) मुक्त करण्यात आलं आहे, असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं आहे.